या 7 गोष्टींपासून दूर राहा, नाही तर वैवाहिक जीवनाचं मातेरं होईल !

| Updated on: Aug 07, 2024 | 8:06 PM

वैवाहिक जीवनात अनेक चढउतार होत असतात. कधी नात्यात गोडवा असतो तर कधी दुरावा. पण कधी कधी वाद इतके टोकाला जातात की त्यामुळे वैवाहिक जीवानाचा सत्यानाश होतो. आयुष्यात अशा काही सात गोष्टी असतात की, त्यामुळे टोकाचे वाद होऊ शकतात.

या 7 गोष्टींपासून दूर राहा, नाही तर वैवाहिक जीवनाचं मातेरं होईल !
relation
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नातं जुळायला अनेक वर्ष लागतात. पण तुटायला वेळही लागत नाही. नवरा-बायकोचं नातं असेल तर मात्र असं होतं. वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी घालवण्यासाठी प्रेम आणि एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. नवरा बायकोमध्ये थोडीफार कुरबूर होत असते. पण त्यामुळे नातंही घट्ट होतं. पण कधी कधी वाद एवढे वाढतात की ते थांबता थांबत नाहीत. कधी कधी तर हे वाद थेट कोर्टापर्यंत जातात आणि त्याची परिणिती विभक्त होण्यामध्ये होत असते. दोघांपैकी एकही जण समंजसपणा दाखवत नाही. चूक कबूल करत नाही आणि दोन पावलं मागे हटायला तयार होत नाही. त्यामुळे वाद विकोपाला जाऊन संसाराचं मातेरं होतं. खास करून वैवाहिक जीवनातील सात गोष्टी अशा असतात की, ज्यामुळे होत्याचं नव्हतं होतं. त्या गोष्टी कोणत्या आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश.

कधी न सुटणारे वाद

अनेकदा नवरा बायकोमध्ये एखाद्या गोष्टीवरून वारंवार वाद होतात. पण हे वाद थांबवण्याऐवजी एखादा पार्टनर ते वाढवतच नेतो. त्यामुळेच हे वाद कधीच सुटत नाही. याप्रकारामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो.

भावनात्मक रुपाने न जोडलं जाणं

कोणतंही नातं निभावयाचं असेल तर इमोशनल अटॅचमेंट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेकदा पती पत्नी एकेमकांना भावनात्मकरित्या जोडलेले नसतात. त्यामुळे त्यांच्यात एकटेपण येतं. वेगळं असल्याची भावना निर्माण होते.

गृहित धरणे

काळानुसार पती-पत्नी एकमेकांना गृहित धरत असतात. पहिल्यासारखं प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं. त्यांना वाटतं ही/हा तर माझीच/माझाच आहे. आणि याच चुकीच्या धारणेमुळे नात्यात अंतर निर्माण होतं.

संवादाचा अभाव

तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं घालवायचं असेल तर तुमच्यात संवाद असायला हवा. नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरचं ऐकलं पाहिजे. तिच्या भावना ऐकून आपल्या भावना शेअर केल्या पाहिजे. तसेच कोणत्याही समस्येवर मिळून तोडगा काढला पाहिजे.

आर्थिक समस्या

अनेकदा आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. वैवाहिक जीवनात आर्थिक तणाव हे वादाचं आणखी एक कारण आहे. पैसेच नसल्याने घरात भांडणं होत असतात. त्यामुळेच नाराजी वाढत जाते.

वेगवेगळं लक्ष्य

नवरा आणि बायकोचं वेगवेगळं लक्ष्य, वेगवेगळं ध्येय हे सुद्धा दोघांमधील वादाचं कारण होतं. बरं ध्येय वेगवेगळं असलं तरी दोघंही एकमेकांना पाहिजे तसा सपोर्ट करत नाहीत. उलट त्या ध्येयाची कधी कधी खिल्ली उडवली जाते. अपमान केला जातो. त्यामुळे नात्यात कटुता येते.

क्वालिटी टाइम न देणं

धावपळीच्या जगात पार्टनर एकमेकांना वेळ देत नाही. प्रत्येक व्यक्ती बिझी असतो. त्यामुळे संवादच होत नाही.