मुंबई : 23 जानेवारी 2024 | सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारपासूनच हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. दुसऱ्याच दिवशी हजारो रामभक्तांनी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर दर्शनासाठी जरी खुलं झालं असलं तरी अद्याप त्याचं संपूर्ण बांधकाम झालेलं नाही. सोमवारी या मंदिराचे विविध आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अयोध्येत ज्याप्रकारे प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बांधलं गेलंय, तसंच देशात इतरही ठिकाणी रामाची मंदिरं आहेत. ही मंदिरं कुठे आहेत, ते पाहुयात..
तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेम इथल्या भद्राचलम याठिकाणी सीता रामचंद्र स्वामी मंदिर आहे. हे मंदिर देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा संबंध रामायण काळापासून असल्याचं मानलं जातं. या मंदिराला ‘दक्षिणेतील अयोध्या’ असंही म्हटलं जातं.
मध्यप्रदेशमधील ओरछा याठिकाणी असलेलं राम राजा मंदिर हे एकमात्र असं मंदिर आहे, जिथे भगवान राम हे राजाच्या रुपात विराजमान आहेत. याठिकाणी त्यांना रोज गार्ड ऑफ ऑनरसुद्धा दिलं जातं. या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्यासोबतच माता सीता, लक्ष्मण, हनुमान, देवी दुर्गा, सुग्रीव आणि जामवंत यांचीही पूजा केली जाते.
पंजाबच्या अमृतसरमध्ये असलेल्या रामतीर्थ मंदिराचाही संबंध रामायण काळापासून असल्याचं मानलं जातं. या मंदिराशी संबंधित असलेली कथा ही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुत्र लव-कुश यांच्याशी जोडलेली आहे. याच ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांनी सीता मातेला आश्रय दिलं होतं, असंही मानलं जातं.
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात करुवन्नूर नदीच्या काठी श्री रामस्वामी मंदिर आहे. याठिकाणी श्रीराम यांची सहा फूट उंची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. या मंदिरात शंकर, गणपती आणि कृष्ण यांचीही पूजा केली जाते.