मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | स्वित्झर्लंड हा पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा देश आहे. नयनरम्य गावं, नेत्रदीपक स्विस आल्प्स, सुंदर नद्या आणि तलाव, हायकिंग, स्कीइंग ट्रेल्स असं सर्वकाही स्वित्झर्लंडमध्ये पहायला आणि अनुभवायला मिळतं. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतातसुद्धा एक दोन नाही तर असे चार मिनी स्वित्झर्लंड आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर घाटीला स्वित्झर्लंडहून अधिक सुंदर पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा केली आहे. स्वित्झर्लंड हे जगातील सर्वांत सुंदर पर्यटनस्थळ नक्कीच आहे. प्रत्येकाला तिथे एकदा तरी भेट देण्याची इच्छा असते. मात्र स्वित्झर्लंड ट्रिपसाठी तुम्ही जितके पैसे खर्च कराल, त्याच्यापेक्षा अत्यंत कमी खर्चात तुम्ही भारतातील चार मिनी स्वित्झर्लंड पाहू शकता.
खज्जियार- हिमाचल प्रदेशमधील ही अत्यंत सुंदर जागा आहे. हे एक छोटंसं गाव असून भारतातील मिनी स्वित्झर्लंड्सच्या यादीत हे अग्रस्थानी येतं. खज्जियार तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या सुरेख दृश्यांची आठवण होईल. याशिवाय इथलं निसर्गसौंदर्य मन प्रसन्न करणारं आहे. ट्रेकप्रेमींना ही जागा खूप आवडते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला कंटाळला असाल तर इथे एकदा नक्की भेट द्या.
औली- भारतातील दुसरा मिनी स्वित्झर्लंड हा उत्तराखंडमधील औली शहर आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ही जागा पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. स्कीईंग आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी इथे हजारो पर्यटक येत असतात. इथली प्रत्येक जागा फोटोजेनिक आहे. इथूनच कैलाश मानसरोवरची यात्रा सुरु होते.
जम्मू-काश्मीर- भारतातील मिनी स्वित्झर्लंडचा विषय असेल आणि त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख नसेल, असं होऊच शकत नाही. हिवाळ्यात इथे पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पांघरलेली पहायला मिळते. बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांचं शूटिंग याठिकाणी होतं. परदेशातूनही अनेक पर्यटक याठिकाणी येतात. श्रीनगर, गुलमर्द, पहलगाम ही पर्यटकांची खास आकर्षणं आहेत.
मणिपूर- जर तुम्ही स्वित्झर्लंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही मणिपूरचाही पर्याय निवडू शकता. मणिपूर हेसुद्धा भारतातील स्वित्झर्लंड म्हणूनच ओळखलं जातं. इथलं सौंदर्य संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कांगलेपाटी, लोकटक तलाव ही पर्यटनस्थळं विशेष प्रसिद्ध आहेत.