मुंबई : 15 जानेवारी 2024 | मुंबईतल्या एका व्यक्तीला ट्रॅव्हल कंपनीकडून 2 लाख रुपयांची भरपाई मिळाली. ही भरपाई मिळण्यामागचं कारणंही अनोखं आहे. ट्रॅव्हल कंपनीने संबंधित व्यक्तीला शहरापासून 50 किलोमीटर लांब सोडल्याने त्याला ही नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेखर हट्टंगडी असं या व्यक्तीचं नाव असून ते 69 वर्षांचे आहेत. 2018 मध्ये त्यांनी सूरत ते मुंबई प्रवासासाठी 745 रुपये भरले होते. पण घरी परतताना त्यांना शहरापासून 50 किलोमीटर लांब सोडण्यात आलं होतं. शेखर हट्टंगडी यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी ‘Travekyaari.com’ या ट्रॅव्हल पोर्टलवरून तिकिट बुक केली होती. सुरतमध्ये नेमका पिक-अप पॉईंट कोणता असेल हे त्यांना सांगण्यात आलं नव्हतं. त्याचप्रमाणे मुंबईबाहेर 50 किलोमीटर दूर त्यांना मध्येच बसमधून उतरवण्यात आलं होतं. जेव्हा त्यांनी याविषयी तक्रार केली तेव्हा अहमदाबाद-मुंबई हायवेवर रस्ते दुरुस्तीची कामं सुरू असल्याने बसला मुख्य हायवेवरून ठाण्याकडे वळवावी लागली, असं कारण सांगण्यात आलं होतं.
हट्टंगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊलो ट्रॅव्हल्सने त्यांना मार्गावरील बदलाची सूचना आधी दिलीच नव्हती. पर्यायी व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन ट्रॅव्हल कंपनीकडून देण्यात आलं होतं. याविषयी स्थानिक ग्राहक आयोगाने म्हटलं की, “तक्रारकर्त्याला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अत्यंत चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी स्वत:च प्रवासाची सोय करावी लागली. त्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला. तक्रारकर्ते हे वृद्ध व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे.”
हट्टंगडी यांनी असंही स्पष्ट केलं की मॅन्टिस टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडने ईमेलद्वारे त्यांची माफी मागितली. परंतु चुकीची जबाबदारी स्वीकारली नाही. मध्यरात्री एकट्याने प्रवास करावा लागल्याने झालेला त्रास, मानसिक आणि शारीरिक ताण यांविषयीही त्यांनी व्यथा व्यक्त केली. “तक्रारकर्त्याला मार्ग बदलण्याबाबत पूर्वसूचना देणं आणि त्यांचं वय लक्षात घेऊन गैरसोय किंवा अप्रिय घटना टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणं हे संबंधित ट्रॅव्हल कंपनीसाठी बंधनकारक होतं. म्हणूनच ते तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार आहेत”, असं आयोगाने स्पष्ट केलं.