मुंबई : धार्मिकदृष्ट्या उत्तराखंडला अनन्यसामान्य महत्व आहे. अनेक लोक दरवर्षी देवदर्शनासाठी उत्तराखंडला (Uttarakhand) येत असतात. हिरवाईने वेढलेल्या उत्तराखंड राज्यात आणि बर्फाच्छादित पर्वतांमुळे याठिकाणी महादेवाचे वास्तव्य असल्याचे म्हटले जाते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री इत्यादी सर्व तीर्थक्षेत्रे येथे आहेत, तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा उगमही उत्तराखंडमधूनच होतो. उत्तराखंडची भूमी इतकी पवित्र आहे की, पांडवांपासून ते अनेक महान राजांपर्यंत अनेकांनी तपश्चर्या करण्यासाठी ही भूमी निवडली होती. पांडवही येथून स्वर्गाकडे निघाल्याचे म्हटले जाते. उत्तराखंडच्या या पवित्र भूमीवर असा धबधबा आहे, ज्याच्या पाण्याला कोणताही पापी (Sinners) स्पर्श करु शकत नाही, असे म्हटले जाते. या धबधब्याला वसुंधरा धबधबा (Vasundhara falls) म्हटले जाते.
वसुंधरा धबधबा बद्रीनाथ धामपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा 400 फूट उंचीवरून खाली कोसळतो. याचे पाणी खाली पडते तेव्हा अगदी मोत्यासारखे दिसते. असे म्हणतात, की उंचावरून पडल्याने त्याचे पाणी दूरवर पोहोचते, परंतु जर पापी त्याच्या खाली उभा राहिला तर त्या पाण्याचा स्पर्श त्या पाप्याच्या शरीरालाही होत नाही. बद्रीनाथ धामला भेट देणारे लोक या धबधब्याचा चमत्कार पाहायला नक्कीच जातात. हा अतिशय पवित्र धबधबा असल्याचे सांगितले जाते. इथे आल्यावर पर्यटकांना आपण स्वर्गात आल्याचा भास होतो.
पाण्यात अनेक औषधी घटक
या झर्याच्या पाण्यात अनेक औषधी तत्वे आहेत, कारण या झर्याचे पाणी अनेक वनौषधी वनस्पतींना स्पर्श केल्यावर खाली येते. ज्या व्यक्तीच्या अंगावर या झर्याचे पाणी पडते, तो माणूस निरोगी होतो, असे म्हणतात. इथे जाण्यासाठी माणा गावातून ट्रेक करून झाडाझुडपातून इथपर्यंत पोहोचावं लागेल.
सहदेवाने प्राण सोडले होते
पांडवांपैकी सहदेवाने येथे प्राण त्यागल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते, की या पाण्याचे काही थेंब तुमच्या शरीराला स्पर्श झाले, तर समजा की तुमच्यात एक पुण्यात्मा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी केवळ भारतच नाही तर परदेशातूनही अनेक पर्यटक येथे येतात.
टीप : सदर मजकूर केवळ उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. यातील तपशिलावर ‘टीव्ही 9 मराठी’ सहमत असेलच असे नाही, तसेच या लेखातून कुठल्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा उद्देश नाही.