पावसाळा येताच अनेकांना ‘मान्सून ट्रिप’ किंवा ‘मान्सून ट्रेक’ची भुरळ पडते. पावसाळ्यात डोंगररांगांतील धबधबे प्रवाहित होतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी असंख्या पर्यटक वीकेंडला धबधबे आणि धरणांच्या ठिकाणी गर्दी करू लागतात. यंदा जुलैच्या सुरुवातीलाच दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर प्रशासनाने अनेक ठिकाणी निर्बंध जारी केले. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पाठीमागील बाजूल असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील नऊ जण वाहून गेल्याची ही घटना होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वजण ते पाहून सुन्न झाले होते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तिथून बाहेर येणं कठीण झालं होतं. अशा वेळी ते सात-आठ जण एकमेकांना धरून गोल करून उभे होते. धरण किंवा धबधब्याच्या ठिकाणी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर काय करावं हे अनेकांना माहीत नसतं किंवा त्या क्षणी सुचत नाही. यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पाण्यात कसं उभं राहायचं, हे त्यात दाखवण्यात आलं आहे.
‘सगुणा बाग’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात दाखवलंय की पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर त्यात घोळका करून उभं राहू नये. तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सरळ एक रांग करून उभं राहायचं, असं त्यात म्हटलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा परिस्थितीत काय करायचं हे सुचलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, अशी कमेंट एकाने केली. त्यावर ‘कुठेतरी पाहिलेलं असलं की येतं लक्षात’ असं उत्तर त्या अकाऊंटवरून देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, असंही त्यात म्हटलंय.
परिस्थिती उद्भवली तर काय करावं याचं कोणीतरी मार्गदर्शन करतंय, हे चांगलंय.. अशा शब्दांत एका युजरने कौतुक केलं. तिथे तेवढी शिल्लक जागा नसेल तर काय करावं, असाही प्रश्न एकाने विचारला आहे. त्यावर ‘वाहत्या पाण्यात तेवढी जागा तर असतेच. नाहीतर कड्यावर किंवा धबधब्याच्या कडेला जाऊन मस्ती करणे हा निव्वळ मूर्खपणाच असू शकतो. अशा वेळेस कोणीच काही करू शकत नाही’, असं उत्तर संबंधित अकाऊंटवरून देण्यात आलं आहे.