मुंबई : प्रत्येकाला कोणती न् कोणती चांगली किंवा वाईट सवय असते. या सवयींमध्ये काही व्यक्तींना टॉयलेटमध्ये मॅग्झिन, पेपर, पुस्तकं वाचायला तर काहींना व्हिडीओ, गाणी ऐकायला पाहायला आवडतात. तर काही लोकांना मोबाईल फोन घेऊन जायची आणि फोनवर बोलण्याची सवय असते. कारण काही लोकांचं म्हणणं असतं की त्यांच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग ते टॉयलेटमध्ये करतात. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईलवर तास न् तास तुम्ही घालवत असाल तर सावध व्हा…कारण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, टॉयलेटमध्ये फोन वापरणं हे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही टॉयलेटमध्ये बसून मोबाईलचा वापर केल्याने मूळव्याध होण्याचा धोका वाढतो, याला सामान्य भाषेत पाइल्स असेही म्हणतात.
तुमच्या घरात तुम्ही कितीही साफसफाई किंवा स्वच्छता करत असाल पण कोणत्याही घरात टॉयलेट ही स्वच्छ जागा मानली जात नाही. कारण टॉयलेटमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि याच ठिकाणी जर तुम्ही मोबाईल घेऊन तास न् तास बसत असाल किंवा तुमचा वेळ घालवत असाल तर ते बॅक्टेरिया तुमच्या फोनवर चिकटू शकतात. तर टॉयलेटमधून तुम्ही बाहेर आल्यानंतर त्याच फोनचा दिवसभर वापर करत असाल तर या फोनवरील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात सहज एन्ट्री करू शकतात. ज्यामुळे तुम्ही स्वतः आजारांना आमंत्रण देतात.