मुंबई : स्त्री किंवा पुरूष, ढोबळमानाने आपल्याकडे हीच ओळख असते. किंवा मग असे लोक जे ना पुरूष असतात ना स्त्री, थर्ड जेंडर, यांचीही ओळख लोकांना होऊ लागली. मात्र काळ बदलू लागला तसा, लोकांचा लैंगिक कल किंवा त्यांना इतरांबद्दल वाटणारे आकर्षण या आधारावर अनेक कम्युनिटींची नावं समोर आली. काही जण स्ट्रेट, तर काही पुरुषांना पुरुषांविषयी आकर्षण, स्त्रियांना स्त्रियांबद्दल, तर काहींना दोघांबद्दल आकर्षण वाटते. त्यांना LGBTQ+ म्हटले जाते. लैंगिकतेचे (Gender) विविध प्रकार असतात. स्ट्रेट, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर आणि अशा अनेकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. (Lesbian, Gay, Bisexual, Transgender, Queer+). पण अलैंगिकता (Asexual) ही नवीच टर्म सध्या समोर येत आहे. ते नक्की काय असतं, माहीत आहे का ? तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी ( स्त्री/पुरूष/ दोन्ही) भावनिक, लैंगिक, शारिरीक आकर्षण वाटू शकतं, पण काही जण असेही असतात ज्यांना कोणाबद्दलच लैंगिक आकर्षण वाटत नाही किंवा अगदी कमी वाटतं. अशा लोकांना असेक्शुअल म्हटलं जातं. ती काही निवड करण्याची गोष्ट नाही. ती भावना मनातून येते. स्त्री अथवा पुरूष , कोणाबद्दलच त्यांना शारीरिक आकर्षण वाटत नाही. किंबहुना सेक्सची गरजच वाटत नाही. अलैंगिकता किंवा असेक्शुअल (Asexual) ही स्ट्रेट, गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर यांसारखीच एक लैंगिक ओळख किंवा कल आहे.
जर्मन वेबसाईटने अशीच एक असेक्शुअल महिला, इसाबेला हिच्यावर रिपोर्ट तयार केला आहे. 22 वर्षीय इसाबेला हिने कधीच सेक्स केलेला नाही. तिने आत्तापर्यंत कोणाचे चुंबनही घेतलेल नाही. ‘सेक्स हे माझ्यासाठी नावडतं काम आहे. नावडतं अशा अर्थाने की, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जवळ जाणं मला बिलकुल आवडतं नाही. त्यांचा वास, घाम या गोष्टींचा तिटकारा वाटतो,’ असं इसाबेलाने सांगितले. अनेक मुलं मला सांगतात, की तू खूप सुंदर आहेस, मग तुला दुसऱ्या कोणाबद्दल शारीरिक आकर्षण कसे वाटत नाही ? असेही ते विचारतात. पण लोकांना माझ्या भावना समजत नाहीत, असे इसाबेलाने नमूद केले. 2020 साली असेक्शुअल लोकांबद्दल वाचल्यानंतर इसाबेला हिला तिच्या भावनांचा नीट अर्थ उमगला आणि स्वत:च्या अलैंगिकतेची (Asexual) जाणीव झाली.
अलैंगिकता किंवा असेक्शुअल (Asexual)लोकांना दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटत नाही. पण याचा अर्थ ते भावनात्मक नाहीत असा होत नाही. ते एखाद्या व्यक्तीशी भावनात्मक पातळीवर जोडले जाऊ शकतात, त्यांना ती साथ हवी असते. फक्त शारीरिक संबंधामध्ये त्यांना रस वाटत नाही.