ठाण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन ही त्यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, ‘आवाज आहे ना. आवाज आपला नसेल तर कुणाचा असेल? मगाशी घोषणा दिली राऊत साहेब आगे बढो. शिवसेना ही चार अक्षरं ज्याच्या पाठी आहे, तो नेहमीच आगे असतो. आम्हाला तर बाळासाहेबांचे आशीर्वाद लाभले आहेत. ज्या ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही.’
‘आपला भगवा सप्ताह आहे. त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींना म्हणतात आम्हाला जगवा. सध्या ते सिनेमे फार काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की दिग्दर्शक. मलाही एक सिनेमा काढायाचा आहे. नमक हराम टू. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम आला होता. अमिताभ आणि राजेश खन्नाचा. मी चांगला लेखक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मी राजकारण घडवतो. बाळासाहेबांनी शिकवलं राजकारण घडवलं पाहिजे, बिघडवलं पाहिजे. तेव्हा मी नमक हराम सिनेमा काढणार आहे. आणि या नमकहरामांची पोलखोल करणार आहे. इथल्या गद्दारांनी ठाण्याचं नाव मातीत मिळवलं. या ठाण्यात अनेक महान लोकं होऊन गेली.’
‘लाडक्या बहिणींची किंमत दीड हजार फक्त दीड हजार. आमदारांना दीड कोटी. जी लाडकी बहीण शिवसेनेसोबत राहिल तिच्या घरावर बुलडोझर. हा गुजरात पॅटर्न आहे. तो महाराष्ट्रात चालणार नाही.’
‘उद्धव ठाकरे यांचा दिल्लीचा दौरा अभिमान वाटावा असा झाला. देशाच्या राजधानीत जेव्हा उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. तेव्हा अहमद शाह अब्दाली घाबरून घरात बसला होता. कुणी बाहेर आलं नाही. पण उद्धव ठाकरेंसाठी रेड कार्पेट अंथरलं होतं. तुमची कबर खोदायला आम्ही दिल्लीत गेलो होतो. आम्ही तुम्हाला गाडायला गेलो होतो. हे दिल्लीत जातात, मोदींच्या निवासस्थानी गवतात बसतात. पांढऱ्या पँटवर गवत लागतं. आम्हाला माहीत आहे दिल्ली. तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका. तुमच्या पोराबाळांची लायकी नसताना तुम्हाला दिल्लीत पाठवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कालपर्यंत दिल्ली देशाची राजधानी होती. ती गुजरातची झाली आहे. आम्हाला ते नष्ट करायचं आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा सह्याद्री धावून गेला आहे. देशावर संकट आहे. हुकूमशाहीचं संकट आहे. म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीला जात असतात.’ असं ही संजय राऊत म्हणाले.