नाशिकः नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होईल. मात्र, मतमोजणी आता 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारी रोजी होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या नगरपंचायतीतील ओबीसी राखीव असणाऱ्या 11 जागांवर आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे. या जागांसाठी मतदान झाल्यानंतर एकत्र मतमोजणी केली जाणार आहे.
अचानक बदल का?
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव केलेल्या जागा आता अनारक्षित केल्या आहेत. तिथे खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचा आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीस राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी नव्याने 23 डिसेंबर रोजी महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.
या ठिकाणी फेरबदल
दिंडोरी येथे 17 पैकी 14 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे सुजित मुरकुटे बिनविरोध निवडून आले आहेत. तर दोन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी असल्याने त्या जागेवर निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सुरगाणा येथे 17 प्रभाग आहेत. या ठिकाणी शिवसेना, भाजप, माकप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारेच पक्ष रिंगणात आहेत. सोबतच इथे दोन महिला माजी नगराध्यक्षांसह सहा महिला नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. पेठ नगरपंचायतीमध्ये बहुतांश नवे चेहरे आहेत. निफाडमध्ये नगरपंचायतीच्या 14 जागा आहेत. या ठिकाणी सत्ताधारी निफाड शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसने या ठिकाणी 5 प्रभागात आणि बहुजन समाज पक्षाने 2 जागांवर उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे पेठ आणि सुरगाणा येथे माकपने बड्या पक्षांना जेरीस आणले आहे. कळवणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीन जागी उमेदवार दिले आहेत.
तूर्तास अशी होतेय लढत
दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.
एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात
Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!