विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, कोणाची मतं फुटणार?

| Updated on: Jul 02, 2024 | 9:47 PM

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. यंदा ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने कोणाचा उमेदवार पडणार आणि कोणाची मते फुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोण कोण क्रॉस वोटिंग करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, कोणाची मतं फुटणार?
Follow us on

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. क्रॉस व्होटिंगची शंका असल्यानं सर्वच पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकरांनीही अर्ज दाखल केलेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुतीनं 9 उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिलेत.

भाजपनं पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनी अर्ज दाखल केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना उमेदवारी देण्यात आली.

महाविकास आघाडीनंही तिघांना उभं केलंय. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय.

विधान परिषदेच्या निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता आहे. 2 वर्षांआधीही ठाकरेंच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. त्याच दिवशी बंड पुकारुन शिंदे सुरतला रवाना झाले होते. आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतांचं समीकरण जर पाहिलं तर सध्या विधानसभेच्या एकूण आमदारांचं संख्याबळ 274 आमदारांचं आहे.

लोकसभेत विजयी झालेले आमदार आणि निधन झाल्यानं 14 जागा रिक्त आहेत. म्हणजेच एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 आमदारांचा कोटा ठेवण्यात आलाय.

महायुतीचं गणित काय

महायुतीत भाजपकडून 5 उमेदवार देण्यात आलेत. भाजपकडे स्वत:चे 103 आमदार आहेत. अपक्ष 5 आणि इतर छोटे पक्ष 7 असं एकूण संख्याबळ आहे 116 आमदारांचं आहे. म्हणजेच सर्व पाचही उमेदवार निवडून येवू शकतात.

शिंदेंच्या शिवसेनेनं 2 उमेदवार दिलेत. शिंदेंकडे स्वत:चे 37 आमदार, अपक्ष 6 आणि बच्चू कडूंचे 2 आमदार असं एकूण संख्याबळ 45 इतकं आहे. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज आहे.

अजित पवारांच्याही राष्ट्रवादीनं 2 उमेदवार दिलेत. दादांकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत. म्हणजेच दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे. बच्चू कडूंच्या प्रहारचे 2 आमदार आहेत. त्यांनी शिंदेंच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

महाविकास आघाडीचं गणित

काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. म्हणजेच प्रज्ञा सातव आरामात निवडून जाणार.

ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिलीय. पण ठाकरेंकडे स्वत:चे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत. म्हणजेच नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी 7 मतांची गरज आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला. पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत. म्हणजेच जयंत पाटलांना 13 मतांची गरज आहे. आता काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना विजयाचा 23 मतांचा कोटा दिल्यावर 14 मतं शिल्लक राहतात. ही 14 मतं आणि इतर 6 ज्यात माकप 1, एमआयएम 2 आमदार, समाजवादी पार्टीचे 2 आमदार आणि शेकापचा 1 आमदार आहे. 14 आणि 6 अशी बेरीज केल्यास 20 आमदार होतात. म्हणजेच आणखी 3 मतांची गरज आहे.

त्यातही काँग्रेस प्रज्ञा सातवांना फक्त 23 इतकीच मतं देणार नाही. 2-3 मतं काँग्रेस स्वत:च्या उमेदवाराला अधिकच देईल. तसं केल्यास आणखी मतांची गरज ठाकरे आणि जयंत पाटलांना लागेल.

क्रॉस व्होटिंग झाल्यास पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे खासदार मिलिंद नार्वेकर मैदानात आहेत. नार्वेकरांचे मुख्यमंत्री शिंदेंसह सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचीच झलक विधान भवनाच्या परिसरात दिसली. नार्वेकर भाजपच्या दरेकरांशी एका कोपऱ्यात बोलताना दिसले तर आशिष शेलार आणि नार्वेकरही चर्चा करताना दिसले.

भाजपच्या उमेदवारांबद्दल बोलायचं झाल्यास पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन निश्चित झालंय. 2019ची विधानसभा आणि आता लोकसभेतही पराभव झाल्यानंतर दीड महिन्याभरातच विधान परिषदेवर संधी मिळाली.

5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. पण कोणीही अर्ज मागे घेईल असं चित्र नाही. त्यामुळं 12 तारखेला मतदान झाल्यावर त्वरित मतमोजणीही आहे. त्याचवेळी स्पष्ट होईल की कोणाचा उमेदवार पडणार आणि क्रॉस व्होटिंग कोणाच्या पक्षाकडून झालं.