नागपूर, 14 डिसेंबर | गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या राज्यातील युवकांना चांगली बातमी दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मेगा भरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. ही भरती नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे होणार आहे. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्यानुसार ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता. जून महिन्यात राज्याचा आकृतीबंद करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे, त्याची माहिती मिळाली, असे सतेज पाटील यांनी म्हटले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहे. यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार आहे. यासाठी गृहमंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी असले पाहिजे, असा सर्व आकृतीबंध झाला आहे. प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. मागील दोन वर्षांत कोव्हीडमुळे भरती झाली नव्हती. त्यानंतर ही भरती सुरु झाली आहे. त्याकाळात देण्यात आलेली वयोमर्यादाची वाढीची मुदत आता संपणार आहे. ती संपण्याच्या आत नवीन भरती करता येईल का? हा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आधी जाहिरात काढून हवे तर नंतर भरती करता येईल का? हा निर्णय गृहविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पोलीस दलात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच आतपर्यंत एक वेळी आठ हजार ४०० युवकांना प्रशिक्षण देता येत होते. त्यामुळे भरतीसाठी मर्यादा होत्या. त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. ही क्षमता वाढवण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.