लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. येत्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 102 जागांचा समावेश आहे. या सर्व जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान केलं जाणार आहे. या निवडणुकीसाठी 1625 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांची कुंडली उघड झाली आहे. यातील 252 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर 450 उमेदवार करोडपती आहेत. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
एडीआरने 1625 उमेदवारांपैकी 1618 उमेदवारांच्या शपथपत्रांचं विश्लेषण केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 102 जागांवरील 42 जागा अशा आहेत की जिथे तीनहून अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या रिपोर्टनुसार 1618 उमेदवारांपैकी 16 टक्के म्हणजे 252 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 10 टक्के म्हणजे 161 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
यापैकी सात उमेदवारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. तर 19 उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 18 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. एकावर तर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तर 35 उमेदवारांवर भडकावू भाषण दिल्याचाही आरोप आहे.
पहिल्या टप्प्यात बिहारच्या चार जागांवर मतदान होणार आहे. यातील आरजेडीच्या सर्व चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर डीएमकेच्या 22 पैकी 13, सपाच्या 7 पैकी 3, टीएमसीच्या 5 पैकी 2, भाजपच्या 77 पैकी 28, एआयएडीएमकेच्या 36 पैकी 13, काँग्रेसच्या 56 पैकी 19 आणि बसपाच्या 86 पैकी 11 उमदेवारांवर गुन्हे दाखल आहेत. आरजेडीच्या चारपैकी दोन, डीएमकेच्या 22 पैकी 6, सपाच्या सातपैकी दोन, टीएमसीच्या पाच पैकी एका उमेदवारावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर बीजेपीच्या 14, एआयएडीएमकेच्या 6, काँग्रेसच्या 8 आणि बसपाच्या 8 उमेदवारांवरही अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्रात येत्या 19 तारखेला पाच जागांवर मतदान होणार आहे. त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरच्या जागेचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचं भवितव्य मतेपेटीत बंद होणार आहे. त्यानंतर राज्यात दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडणार असून यावेळी 8 जागांसाठी मतदान होणार आहे.