मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : राज्यात कोणतेही आंदोलन सुरु होताच पहिला दगड राज्याच्या ग्रामीण भागाची रक्तवाहीनी मानल्या जाणाऱ्या एसटी बसवरच पडतो. राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलन चिघळले असून गेल्या चार ते पाच दिवसात एसटी महामंडळाच्या ( MSRTC ) अनेक बसेसची तोडफोड सुरु आहे. त्यामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात आता एसटी सेवा बंद ( ST Bus ) ठेवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर या ठिकाणावरुन मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात 85 एसटी बसेसची तोडफोड झाली असून सुमारे चार कोटी रुपयांचे महामंडळाचे नुकसान झाले आहे. तर रोजचा साडे तीन कोटींचा महसूल बुडत असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी बसला बसला आहे. सध्या राज्यात शालेय मुलांच्या सहामाही परीक्षा सुरु असून आंदोलनामुळे मराठवाड्यातील जवळपास 50 डेपो बंद ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची लाइफलाईन बंद पडल्याने अनेक मुला-मुलींना परीक्षेला जाण्यासाठी खाजगी वडापचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाड्यातील धाराशीव, परभणी, लातूर, जालना, नांदेड, बीड तसेच सोलापूर जिल्ह्यातील एसटीची वाहतूक ठप्प आहे. इतर जिल्ह्यात अंशत: एसटी सेवा सुरु आहे.
गेल्या चार दिवसात 85 पेक्षा अधिक बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच 70 बसेसची मोडतोड झाली आहे. तर चार बसेस जाळण्यात आल्या आहेत. एसटी बसेसच्या तोडफोडीमुळे महामंडळाचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पन्नास आगारातील वाहतूक पूर्ण बंद झाल्याने महामंडळाचे रोजचे तीन ते साडे तीन कोटींचे आर्थिक उत्पन्न बुडत असल्याची माहीती एसटी महामंडळाने दिली आहे.
एसटी महामंडळाचे उत्पन्न कोरोना काळानंतर प्रथमच आता कुठे वाढले होते. कोरोना काळाआधी एसटी महामंडळाला दररोज वीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यानंतर कोरोना आणि एसटीचा ऐन दिवाळीत लांबलेला संप यामुळे एसटीचे चाक आर्थिक गर्तेत अडकत चालले होते. एसटी संचित तोटा प्रचंड वाढला होता. एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास योजना सुरु केल्याने एसटीचे प्रवासी प्रचंड वाढल्याने आणि त्याची भरपाई प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळत असल्याने एसटीला हळूहळू फायदा होऊन एसटी संकटातून बाहेर येत होती असे म्हटले जात होते.