एकाच दिवसांत अजितदादांच्या राष्ट्रवादीत 4 प्रवेश आणि चौघांनाही तात्काळ तिकीट

| Updated on: Oct 25, 2024 | 10:47 PM

एकाच दिवसांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत 4 प्रवेश झाले आहेत आणि चौघांनाही अजित पवारांनी तात्ताळ विधासभेचं तिकीटही दिलं आहे. विशेष म्हणजे 4 पैकी 3 नेते भाजपचेच आहेत. काय आहे हे राजकीय गणित समजून घ्या.

एकाच दिवसांत अजितदादांच्या राष्ट्रवादीत 4 प्रवेश आणि चौघांनाही तात्काळ तिकीट
Follow us on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एकाच दिवसात चार नेत्यांनी प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या चारही नेत्यांना अजित पवारांनी विधानसभेचं तिकीट ही दिले आहे. आज सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटीलही अजित दादांसोबत आले आहेत. नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनीही अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती हाती घेतलं. तर काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिक्कीही दादांच्या राष्ट्रवादीत आले आहेत. चौघेही नेते दादांसोबत आले आणि चौघांनाही तात्काळ तिकीटही घोषित झालं.

संजय काका, निशिकांत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर तिघेही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण तिन्ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असल्यानं, उमेदवार मूळ भाजपचा आणि तिकीट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अशी स्थिती आहे. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून संजय काका पाटलांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटलांशी आहे.

इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील यांची लढत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष दिग्गज नेते जयंत पाटलांशी आहे. वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दिकींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई आहेत. वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ असून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.लोहा-कंधार मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनाथ पवार मैदानात आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दिकींनी काँग्रेसवर धोका दिल्याचा आरोप करत, वडिलांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करणार असं म्हटलं आहे. काही दिवसांआधीच झिशान सिद्दिंकीचे वडील बाबा सिद्दिक्कींची बिश्नोई गँगकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

भाजपच्या 3 नेत्यांची दादांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग झाली असली तरी नवाब मलिकांवरुन स्पष्ट शब्दात विरोध करण्यात आलाय. पण मलिकांची मुलगी सना मलिकांना मात्र मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर झालीये. नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर मधून अजित पवार तिकीट देणार होते. मात्र भाजपच्या विरोधानंतर मलिकांचा पत्ता जवळपास कट झालाय. पण अजित पवारांनी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.

सना मलिकांनी मात्र नवाब मलिक निवडून लढतील असं म्हटलंय. म्हणजेच मलिक अपक्ष लढू शकतात. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार अबू आझमी पुन्हा उमेदवार आहेत. आझमींच्या विरोधात नवाब मलिक अपक्ष लढू शकतात.

नवाब मलिकांवर विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनीच दाऊदशी संबंधित जमीन व्यवहारावरुन आरोप केले होते. त्यानंतर मलिक जेलमध्ये गेले होते. त्यामुळं अजित पवार जरी भाजपसोबत आले असले तरी मलिकांवरुन भूमिका बदलणं भाजपसाठी कठीण आहे.