नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरीपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर चिंचले खैरे भाग आहे. या भागातील गावठा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. 12 मार्चला रात्रीच्या सुमारास शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर (Women) बिबट्याने (leopard) हल्ला करून जंगलात फरफटत नेले. त्याचदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या दरम्यान, रात्री बिबट्या पुन्हा त्या झापावर भक्ष्याच्या शोधात आला असता ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाला आहे. हा परिसर वन विभागात असल्याने बिबट्याचा वावर हा स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी बिबट्यासंदर्भात काय दक्षता घ्यावी, याची माहिती वनविभाग जनजागृती करुन देत आहे. मात्र, वाढता प्राण्यांचा वावर पाहता स्थानिकांना याठिकाणी धोका निर्माण झाला आहे. आता यातून वनविभाग कसा मार्ग काढणार ते येत्या काळातच कळेल.
चिंचले खैरे भागातील गावठा परिसरामध्ये महिलेला बिबट्याने फरफटत नेल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ चिंतेत आले आहेत. शिकारीसाठी त्याने गावातील व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर हल्ला करण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं ग्रामस्थ सांगतायेत. तर याच परिसरातील काही आदिवासी पाड्यात मोजकीच घरे असल्याने त्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याचा वावर असल्याने लहान मुलांना घराबाहेरही सोडता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. बिबट्या कधी पकडला जातोय याकडे लक्ष लागले आहे.
चिंचले खैरे भागातील गावठा परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे बिबट्या किंवा कोणते वन्य प्राणी येतात, हे सीसीटीव्हीत कैद होतायेत. मात्र, या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केले जात आहे. कारण, ग्रामीण भाग असल्यानं लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक घरी असतात. घरातील इतर लोक शेतात जातात. यामुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आता वन विभाग बिबट्याला कधी जोरबंद करतो, ते पाहणं महत्वाचं ठरेलं. दरम्यान, ग्रामस्थांनी देखील खबरदारी घेत मुलांना घराबाहेर एकटे सोडायला नको. बिबट्याचा बंदोबस्त होऊस्तर तरी काळजी घेणं गरजेचं आहे.
इतर बातम्या