भाजपला मोठा धक्का, मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयुर मुंडे यांचा पक्षाला रामराम

| Updated on: Oct 05, 2024 | 4:24 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आणि समर्थक मयुर मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मयुर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधलं होतं.

भाजपला मोठा धक्का, मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयुर मुंडे यांचा पक्षाला रामराम
Follow us on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळेच पक्ष कामाला लागले असून आचारसंहिता लागण्याच्यासाठी आपण केलेल्या कामांचा जोरदार प्रचार करत आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला एक धक्का बसला आहे. कोथरूड आणि खडकवासला येथील विद्यमान आमदारांनी उमेदवार निवड प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप होत आहे. तर शिवाजीनगरच्या आमदाराने निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आता भाजपचे कार्यकर्ते आणि श्री नमो फाउंडेशनचे मयुर मुंडे यांनी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर आरोप केले आहेत. यासोबतच मयूर मुंडे यांनीही भाजपला रामराम केला आहे. मयुर मुंडे यांनी 2021 मध्ये औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले होते. ते म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे. मी विविध पदांवर प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे. इतर पक्षातून येणाऱ्यांना पक्ष महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इतर पक्षातून आलेल्यांना महत्त्व

आपला जनाधार भक्कम करण्यासाठी आमदार आपल्या लोकांना संघटनेत पदे देत आहेत. इतर पक्षातून आलेल्या लोकांना पक्षात विविध पदांवर नियुक्त केले जात आहे. जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. याशिवाय पक्षाच्या बैठकांना बोलावले जात नाही. त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश केला जात नाही. असा आरोप मयुर मुंडे यांनी केला आहे.

इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या लोकांच्या मतदारसंघात आमदार विकास निधी खर्च करतात, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना निधी दिला जात नाही. असा आरोपही मयुर मुंडे यांनी केलाय. गेल्या पाच वर्षात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकही दोन मोठे प्रकल्प राबविण्यासाठी आमदारांनी ना निधी आणला ना कोणते प्रयत्न केले. त्यामुळे परिसराचा विकास ठप्प झाला आहे असा आरोप ही त्यांनी केलाय.

मोदींना पाठवला राजीनामा

मी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मयुर मुंडे म्हणाले. मी पीएम मोदींचा कट्टर समर्थक आहे आणि त्यांच्यासाठी काम केले आहे पण आमच्यासारख्या लोकांना पक्षात स्थान नाही म्हणून मी पक्ष सोडत आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय, राज्य आणि शहर भाजप प्रमुखांना पाठवली आहे.