मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : दादरमधील कोहिनूर बीएमसी पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीमध्ये जवळपास 16 – 17 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या धक्कादायक घटनेत जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोहिनूर बीएमसी पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री आग लागली होती. आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच पार्किंगमध्ये गाड्या पार्किंग करण्यासाठी देखील सोडण्यात येत नसल्याची माहिती समोर येत आहे.
आग नक्की कशामुळे लागली याचं कारण समोर आलेलं नाही, पण पालिकेकडून आणि कोहिनूर पार्किंग व्यवस्थापनेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मध्यरात्री परिसरात आग लागली होती आणि रात्रीच अग्निशमन दलाकडून विझवण्यात आली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलिंगचं काम देखील पूर्ण झालं आहे. पण सकाळपासून वाहने पार्किंग परिसरात येण्यास मज्जाव केला जात आहे. सांगायचं झालं तर, कोहिनूर आणि पालिकेच्या पार्किंगमध्ये सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. पण रात्री लागलेल्या आगीमुळे पार्किंग व्यवस्था थांबवण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी 9 वाजता पोलीस पथक घटनास्थळी दाखल होणार असून, आग नक्की कशामुळे लागली याची चौकशी करणार आहेत. कंत्राटदारांकडून नियमांच उल्लंघन करून गाड्या पार्किंग केल्या जात असल्याचा स्थानिकांच्या आरोप आहे. त्यामुळे आग कशामुळे लागली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘आगीचं कारण कळलेलं नाही. पण आग नियंत्रणात आलेली आहे. 4 -6 किंवा त्याहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवांनी आग विझवली आहे. पण आता सध्या तेथील परिस्थिती काय आहे, याबद्दल काही सांगता येणार नाही, कारण जाण्यासाठी कोणाला परवानगी नाही.’ असं वक्तव्य घटनास्थळी दाखल झालेल्या माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.