वादाचा नवा एपिसोड, आनंद दिघेंच्या मृत्यूवरुन केलेल्या दाव्यावरुन राजकारण तापलं

| Updated on: Sep 28, 2024 | 8:30 PM

आनंद दिघे यांच्या मृत्यूवरुन शिंदेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थितीत करण्यात आलाय. दिघेंना मारलं गेलं आणि हार्ट अॅटकचं कारण देण्यात आलं, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. तर 23 वर्षे गप्प कसे राहिले, पुरावे द्या असं आव्हान दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी दिलंय.

वादाचा नवा एपिसोड, आनंद दिघेंच्या मृत्यूवरुन केलेल्या दाव्यावरुन राजकारण तापलं
Follow us on

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांना मारलं गेल्याचा दावा करुन पुन्हा खळबळ उडवून दिली. सध्या धर्मवीर टू सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून, दिघेंना मारण्यातच आलं, असं शिरसाटांनी म्हटल्यानं दोन्ही शिवसेनेत चकमक सुरु झाली आहे. 2022 मध्ये धर्मवीर सिनेमा आला, त्यावेळीही असेच आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी 2 मे 2022 रोजी दिघेंच्या मृत्यूवरुन भाष्य केलेलं आहे. ज्यात शिंदे म्हणतायत की, आनंद दिघेंना हृदयविकाराचा झटका आला. अॅक्सिडेंट झाला होता पायाला, परंतू निदान जे केलेलं आहे ते हृदय विकाराच्या झटक्यानंच त्यांना मृत्यू झाला असं आहे.

‘दिघेंची ओळख घट्ट करण्यासाठी पार्ट टू’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘दिंघे साहेबांचा कार्य आणि दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे पार्ट १ हा होता आणि दिघे साहेब काय आहेत हे जगासमोर त्यांची ओळख अधिक घट्ट करण्यासाठी हा पार्ट २ केला आहे. त्यांचं कार्य एका सिनेमात साचेबद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे हा पार्ट टू केला आहे. यात आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती जगासमोर येणार आहे. हिंदीत देखील हा सिनेमा येणार आहे. त्यामुळे मी धर्मवीर पार्ट टू ला खूप खूप शुभेच्छा देतो.’

दिंघेंच्या मृत्यूवरुन शंका

दुसरीकडे आनंद दिघे यांच्या मृत्यूवरुन शंका किंवा आरोप करणारे शिरसाट पहिलेच नाहीत. याआधी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ही दिघेंसोबत काय झालं हे सांगावं लागेल, असं म्हटलंय. मात्र त्यावर स्वत:नारायण राणेंनी, दिघेंच्या मृत्यूमागे घातपात नव्हता, निलेश राणेंना मी नीट माहिती देईल असं सांगून पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर, आनंद दिघेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे धर्मवीर सिनेमात दाखवण्यात आलं.

सिनेमात आधी राज ठाकरे दिघेंच्या भेटीला पोहोचतात. दिघेंची भेट घेवून निघत असताना, दिघेंची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे पोहोचतात. थोड्याच वेळात दिघे आपल्या हॉस्पिटल बाहेर जमलेल्या समर्थकांना खिडकीतून हात दाखवतात. नंतर दिघेंच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांचा मृत्यू होतो. मृत्यूची बातमी समजल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा रुग्णालयात येतात. दिघेंची मृत्यूची बातमी पसरताच दिघेंचे समर्थक आक्रमक होतात आणि हॉस्पिटलला आग लावली जाते.

सिनेमातील सीनवरुन टीका

आता धर्मवीर टू सिनेमातील एका सीनवरुनही टीका सुरु झालीय. फॅक्टमध्येच चूक केल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. ज्यात एकनाथ शिंदे दिघेंना विचारतात की राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला. शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला. राज ठाकरेंसारखा झंझावात घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येवून आदळलंय. त्यावर दिघे म्हणतात की, काय चाललंय तुझ्या मनात, तुला नक्की काय करायचंय. आता या सीनवरुन संजय राऊतांनी सिनेमा काल्पनिक आणि बोगस असल्याची टीका केली आहे.

राऊत यांची सिनेमावर टीका

सिनेमात दाखवलेल्या सीनमध्ये एकनाथ शिंदे राज ठाकरेंना डावललं गेलं तेव्हा आवाज का नाही उठवला असा सवाल दिघेंना करत आहेत.
आनंद दिघेंचं निधन 2001 मध्ये झालं. उद्धव ठाकरेंना शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून कमान 2003मध्ये सोपवण्यात आलं. आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडली 2005 मध्ये. त्यामुळं दिघेंच्या हयातीत जे घडलंच नाही ते दाखवण्यात आल्याचं राऊतांचं म्हणणं आहे.

सिनेमा पाहा मग तो सीन काय आहे हे समजेल असं सिनेमाची पटकथा लिहिणारे प्रवीण तरडे म्हणत आहेत. सिनेमात दाखवलेल्या गोष्टींचं ते समर्थनच करतायत. अर्थात सिनेमातल्या सीनचा मुद्दा बाजूला ठेवला. तरी सध्या शिरसाटांनी दिघेंच्या मृत्यूवरुन केलेल्या दाव्यावरुन राजकारण तापलंय.