वर्धाः वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काळे फासण्याचा डाव एका व्हायरल झालेल्या ऑडियो क्लीपमधून उघड झाला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार समीर कुणावार आणि प्रवीण महाजन यांच्यातील ही क्लीप आहे. त्यात आमदार कुणावर तुम्हाला जे करायचे ते करा, असा सल्ला देताना दिसत आहेत. हे सारे पाहता येणाऱ्या काळात पुन्हा एकदा इतक्या दिवस थंड पडलेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
केंद्री मंत्री नितीन गडकरी यांचा हिंगणघाट येथे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सातत्याने मागणी होत असणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून बासनात गुंडाळून पडलेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न होणार होता. त्यासाठी गडकरी यांना काळे फासण्याचा डाव होता. विशेष म्हणजे यात भाजप आमदार समीर कुणावार आणि प्रवीण महाजन या दोघांमध्ये संवाद झाला. यावेळी आमदार कुणावार यांनी येथे नाही तुम्हाला नागपूरमधघ्ये जे करायचे ते करा, असा सल्लाही दिल्याचे समोर आले आहे.
काय आहे क्लीपमध्ये?
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मीडियापुढे स्टंट करायचे म्हणत हे संभाषण व्हायरल झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील परडा इथल्या प्रवीण महाजन नावाच्या व्यक्तीने हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांना मोबाईलवर संपर्क साधला. या संवादाची ही ऑडिओ क्लीप आहे. त्यात महाजन आपल्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करायची म्हणतात. त्यासाठी निवेदन द्यायचे आहे. मात्र, सोबत शाई आणणार आहे. हा स्टंट असल्याचा उल्लेखही त्यांनी या संभाषणात केला.
पोलिसांनी घेतले ताब्यात
आमदार समीर कुणावार यांनी ही बाब चुकीची आहे, असे काही करू नये,असे आवाहन केले. निवेदन देणे ठीक आहे, पण इतर बाबी चुकीच्या आहेत. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर नागपुरात करावे, असे महाजन यांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी समुद्रपूर तालुक्यातील परडा इथल्या प्रवीण महाजनला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर काही वेळाने प्रवीण महाजनने याचा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. त्यात चुकीने ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. असा कोणताही हेतू नव्हता. यामुळे काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील तर क्षमस्व, असे म्हटले आहे.
माफीनाम्याचा मेसेज
व्हायर मेसेजमध्ये म्हटले आहे की, माझ्याकडून चुकीने आमदार समीर कुणावार यांच्याशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. माझा याबाबत नामदार नितीन गडकरी साहेबांची मानहानी करण्याचा हेतू नव्हता. असे करावे का, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी माननीय आमदार समीरभाऊ कुणावार यांना फोन केला. मात्र, असे काही करण्याचा उद्देश नव्हता आणि नाही. त्यासाठी हा खुलासा करीत आहे. काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील तर क्षमस्व. आपला प्रवीण महाजन.