मुंबई: मराठा समाजाच्या (maratha) आरक्षणाचा प्रश्नही निकाली निघावा म्हणून राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या मागासलेपणाचाही अभ्यास करण्यात येणार आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन करण्यात येणार आहे. या आयोगामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी दिली आहे. काल विधान परिषदेत मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात नियम 97 अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. राज्य शासनाने प्रथम पुनर्विलोकन याचिका दाखल करावी आणि त्यावर निर्णय झाल्यानंतरच राज्य मागास वर्ग आयोगाचे गठन करावे, अशी शिफारस माजी न्या. दिलीप भोसले (dilip bhosale) यांनी केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्य शासनाने प्रथम पुनर्विलोकन याचिका दाखल करावी आणि त्यावर निर्णय झाल्यानंतरच राज्य मागास वर्ग आयोगाचे गठन करावे, अशी शिफारस माजी न्या. दिलीप भोसले यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकार पुनर्विलोकन याचिकेवरील निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, त्यास विलंब होत असल्याने स्वतंत्रपणे मागास वर्ग आयोगाचीही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मागास वर्ग आयोग गठन करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची घोषणा होईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना दिले असले तरी मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झालेला नाही. राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केल्यानंतरही आरक्षणाची 50 टक्के आरक्षण मर्यादा हा मोठा अडसर कायम राहणार आहे. केंद्राच्या पातळीवर 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल केली तर मराठा आरक्षणाच्या अडथळ्यांची शर्यत थोडी सोपी होईल, असे त्यांनी सांगितलं.
केंद्र आणि राज्य मिळून मराठा आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
मागील सरकारच्या काळातील कुठल्याही सवलती बंद केलेल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या 18 वारसांना आजवर सेवेत सामावून घेण्यात आले आहे. 34 वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात आले आहेत. 326 पैकी 324 गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. राज्यातील 14 ठिकाणी वसतीगृहांची जागा व संबंधित संस्था निश्चित झाल्या असून, 7 वसतीगृहे कार्यान्वीत झाली आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय रहावा, यासाठी सहसचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सारथीच्या पुणे येथील मुख्यालयाचे भूमिपूजन झाले आहे. कोल्हापूरचे उपकेंद्र कार्यरत झाले असून, उर्वरित 7 ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय झाला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज बंद नसून, वैयक्तिक कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख तर व्याज परतावा 3 लाखांवरून 4.50 लाख रूपये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकर गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल. https://t.co/30b4vCTzBU
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 25, 2022
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार -किरीट सोमय्या