रत्नागिरी | 19 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. राजन साळवी यांच्या घरी एसीबीने काल आठ तास झाडाझाडती घेतली. त्यानंतर एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांना घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेऊन गेले. एबीसी अधिकाऱ्यांनी तिथे जावून साळवी यांच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांची छाननी केली. या सगळ्या घडामोडींनंतर राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. एसीबीची आपल्याला नोटीस आली असून एबीसीने आपल्या मोठ्या भावाला चौकशीसाठी घेऊन येण्यास सांगितलं आहे. संबंधित कारवाई ही अटकेपूर्वीची कारवाई असल्याचा दावा साळवी यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“एसीबीची मला नोटीस आली आहे. एसीबीच्या रत्नागिरी ऑफिसची मला नोटीस आली आहे. त्यांनी चौकशीचा मोर्चा मोठे भाऊ दीपक साळवी यांच्याकडे वळवला आहे. दीपक साळवी यांना चौकशीसाठी घेऊन या अशी नोटीस आली आहे. आम्ही चौकशीसाठी हजर राहणार आहेत. एसीबीची ही अटकेपूर्वीची कारवाई आहे असं मला वाटतं”, असा मोठा दावा राजन साळवी यांनी केला.
“एसीबी सर्व कुटुंबाला वेठीस धरत आहे. माझ्या चौकशी दरम्यान 70 लोकांना नोटीस निघाल्या होत्या. माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी सर्व माहिती एसीबी कार्यालयाकडे केव्हाच दिली आहे. कुटुंबाला त्रास देणे हा त्यांचा अजेंडा दिसतोय. अपसंपदे संदर्भातली कुठलीही माहिती मला दिलेली नाही. मी सर्व टॅक्स भरले आहेत. माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर आहे. सहा वेळा झालेल्या चौकशीत सर्व माहिती मी दिली आहे”, असं राजन साळवी म्हणाले.
“त्रास द्यायचा भीती दाखवायची. कशासाठी हे सर्व केलं जातंय? माझं कुटुंब माझ्या पाठीमागे ठामपणे उभं आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल”, अशी आशा राजन साळवी यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका राजन साळवी यांनी कालच व्यक्त केली होती. आपल्याला अटक केली तर आपले कार्यकर्ते कोर्टात जामिनासाठी अर्ज करतील. त्यानंतर न्यायालय आपल्याला न्याय देईल, असं राजन साळवी म्हणाले होते.