मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आता परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले असून, परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
एसआयटीने जे काही काम केलं आहे, त्यानुसार फर्दर डेव्हल्पमेंट नुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे कुणी मागणी केली याचा विषय नाही. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीने काम केलं आहे . कोणत्या गुन्ह्यात लावला काही माहीत नाही. कुणाला सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल.
पोलीस यंत्रणा आहे. आम्ही बोलून काही होत नाही. एसआयटी प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी नियमाप्रमाणे जी कडी जोडली असेल त्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल. तिथे काय घडलं मला माहीत नाही. एसआयटीने कोर्टासमोर अर्ज केलाय एवढंच मला माहीत आहे. पण कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो हे मात्र निश्चित. आता एसआयटीनं कारवाई केली आहे. परत परत त्यावर बोलण्याची गरज नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
परळी बंद
परळीमध्ये आज सकाळपासूनच वाल्मिक कराड समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड यांच्या आईची तब्येत देखील खालावली. दरम्यान त्यानंतर वाल्मिक कराडवर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावताच परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. परळी बंदची हाक देण्यात आली असून, वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. परळीत जोरदार आंदोलन सुरू आहे. समर्थक आक्रमक झाले आहेत.