नाशिकः मालेगवामध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली आहे. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून, कारवाई सुरू आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी घटनेमागच्या सूत्रधाराला शोधून काढावे, अशी मागणी केली आहे.
त्रिपुरामध्ये झालेल्या कथित घटनेचे पडसाद शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बंदमध्ये उमटले. बंदमध्ये काही माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घालून शहराला वेठीस धरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर नंगानाच केला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांनाही सोडले नाही. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. काही संशयितांनी पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. पोलिसांनी अखेर या संशयितांची धरपकड सुरू केली असून, आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, सीसीटीव्हीच्या क्लिपमधून अजून काही गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात येतील. सध्या शहरात शांतता आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमकही मागवली आहे.
आमदारांकडून चौकशीची मागणी
मालेगावमधील घटनेच्या मागे कोण आहे. याचा तपास पोलिसांनी कसून करावा, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केली आहे. मालेगावच्या बाबतीत पोलीस नेहमीच कमी पडतात. जनतेला शांततेच आवाहन करतो. पोलिसांनी निष्पापांवर गुन्हे दाखल करू नयेत. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केली.
पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली आहे. आतापर्यंत दहा जणांना बेड्या ठोकल्या असून, अजून काही जणांना अटक करण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे.
– सचिन पाटील, पोलीस अधीक्षक
(Additional police assistance requested in Malegaon, Superintendent of Police informed; MLAs demand to find the mastermind behind the incident)
Sonam Kapoor | भारतीय पोशाखातही ग्लॅमरचा तडका, सोनम कपूरचा दिलकश अंदाज पाहून चाहतेही घायाळ!#SonamKapoor | #Bollywood | #Entertainment https://t.co/QPw67BsFsS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021