मुंबई : आजपासून मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाले आहे, 15 ते 18 वर्षे वयोगटाच्या लसीकरणास मान्यता मिळाल्याने आता या वयोगटातील प्रत्येक मुलाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत घेवून पाल्यांचे लसीकरण पूर्ण होईल, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वांद्रे-कुर्ला संकूल कोविड आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रातून आज सकाळी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी आदित्य ठाकरे हे बोलत होते.
मुंबईत वेगवान लसीकरण मोहिम
महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर शाळेची दहावीतील विद्यार्थिनी तनुजा माकडवाला हीला या वयोगटात पहिली लस घेण्याचा मान मिळाला. तर त्यानंतर राजन हेमंत बारी या विद्यार्थ्याने लस घेतली. पहिली मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट स्वरुपात प्रदान करुन या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार देखील याप्रसंगी करण्यात आला. लसीकरण शुभारंभ निमित्ताने मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविड विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार वेगाने फैलावतो आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. मास्क योग्यरित्या लावणे, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करावे. घाबरुन न जाता योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू शकते. संभाव्य तिसऱया लाटेला सामोरे जाण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व नवयुवकांनी पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस योग्य मुदतीत घेवून लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही ठाकरे यांनी अखेरीस केले. 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील. लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरुन न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी घ्यावीत. त्याचप्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्यास नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात संपर्क साधावा. असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.