नाशिकः नाशिक जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासन दक्ष झाले आहे. नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाच्या नियम पालनाचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 887 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
या रुग्णांवर उपचार सुरू
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 29, बागलाण 7, चांदवड 5, देवळा 4, दिंडोरी 11, इगतपुरी 20, कळवण 5, मालेगाव 4, नांदगाव 5, निफाड 38, सिन्नर 23, त्र्यंबकेश्वर 3, येवला 24 अशा एकूण 178 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 158, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 6 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून, असे एकूण 353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 979 रुग्ण आढळून आले आहेत.
24 तास कोव्हॅक्सीन लस
नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे प्रशासन लसीकरण जास्त करण्यावर भर देत आहे. नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सोमवारपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे.
नियम पालनाचे आवाहन
महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, 2 पर्याय सुचवले
India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल?