रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : जेष्ठ वकील उज्ज्वल निकम (ADV Ujjwal Nikam) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. खरंतर, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे दोन गट निर्माण झाले. त्यातच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मागितले होते. त्यावरून उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह दिले होते. त्यानुसार अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नावं हीच राहतील का ? धनुष्यबाण चिन्ह मिळेल की मिळालेल्या चिन्हावरच आगामी महापालिकेच्या निवडणुका लढवाव्या लागतील याबाबत जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे.
जेष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले, निवडणूक आयोगाने शिवसेना दोन्ही गटांना जे चिन्ह वाटप केले ते फक्त अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी होते.
जर मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या तर निवडणूक आयोगाला चिन्हा आणि पक्षाबाबत निर्णय घ्यावा लागेल. सध्याचे चिन्ह की धनुष्यबाण चिन्ह कोणाचे.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय त्यांच्यासमोर सुरू असलेल्या निवडणूक चिन्हाची सुनावणी जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी संपली तर तो वाद मिटू शकतो.
याशिवाय जर ही सुनावणी प्रलंबित राहिली तर सध्या देण्यात आलेली चिन्ह आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वापरावी लागतील असं दिसून येत आहे, असं निकम म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाला बाळसाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहेत तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मिळाले आहे.
त्यामुळे येत्या काळात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, महापालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.