दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ लागले आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युतीझाली आहे. तर आता वंचित बहुजन आघाडीने साथ सोडलेल्या एमआयएमकडून नवी राजकीय खेळी खेळली जाण्याच्या शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला आणि विशेषतः प्रकाश आंबेडकर यांना साथ देण्यासाठी एमआयएमकडून दलित संघटनेसोबतच आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातील निवडणुका बघता आघाडी लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना धक्का देण्यासाठी आंबेडकर घराण्यातील व्यक्तीलाच सोबत घेण्यासाठी एमआयएमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहे.
2019 च्या लोकसभा आणि विधानसभेला एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. या युतीचा मोठा फटका हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला होता.
त्यामुळे एमआयएमकडून प्रकाश आंबेडकर यांनी साथ सोडल्यानंतर पुन्हा आंबेडकर घराण्यातील व्यक्तीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा हात सोडल्यानंतर एमआयएम नव्या दलित संघटनेला सोबत घेणार असल्याची तयारी सुरू झाली आहे. एक ते दोन महिन्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्याशी एमआयएम आघाडी करण्याची शक्यता आहे. एमआयएम कडून आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना आणि एमआयएमची आघाडी लवकरच घोषित होण्याची शक्यता असून महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आघाडीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक युती आणि आघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एमआयएम देखील दलित संघटनेला सोबत घेऊन आपली ताकद कशी वाढवता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहे.