मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधासभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. हरियाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर जम्मूमध्ये ही भाजपला आपली मतं वाढवण्यात यश आलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. हरियाणात भाजपला 48 जागा मिळाल्या असून बहुमताचं सरकार स्थापन करत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती 15 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार आहे.
हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारा भाजप हा पहिलाच पक्ष ठरला आहे. हरियाणाच्या स्थापनेपासून आतापर्यंत कोणताही पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला नव्हता. लोकसभा निवडणुकीत कमी जागा आल्याने भाजपचा आलेख घसरू लागला आहे असे बोलले जात होते. पण हरियाणातील या बंपर विजयाने पक्षाचे मनोबल उंचावले आहे. आता त्याचा परिणाम आगामी तीन राज्यांच्या निवडणुकीतही दिसून येईल.
हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरण्याचं काम नेत्यांना करावे लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते उत्साहीत असून आणखी मेहनतीने मैदानात उतरणार आहेत. येत्या 4 महिन्यांत 3 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकांच्या तारखा दसऱ्यानंतर जाहीर करू शकतो. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे आणि झारखंडचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. त्याचबरोबर 6 राज्यांतील 28 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखाही यासोबत जाहीर केल्या जाऊ शकतात.
महाराष्ट्रात सध्या एनडीएचे सरकार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पुढे मराठा आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे. मनोज जंरागे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागावर इंडिया आघाडीला विजय मिळालाय. तर एनडीएला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी विधानसभेच्या समान टक्केवारीत जागा बदलण्यात यशस्वी ठरली, तर ती एकूण 288 जागांपैकी 160 जागा जिंकू शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल लोकांची सहानुभूती हे आणखी एक आव्हान असू शकते.