कोल्हापूर (भूषण पाटील) : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील पालक मंत्र्यांच्या नावाची अखेर काल घोषणा करण्यात आली. पालक मंत्रीपदावरुन महायुतीच्या सरकारमध्ये रस्सीखेच होतीच. त्यामुळे नाव जाहीर झाल्यानंतर थोडी धुसफूस होणं अपेक्षित होतच. खासकरुन पुण्याच्या पालक मंत्रीपदाची विशेष चर्चा झाली. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत. आता त्यांच्याजागी अजित पवार यांची पुण्याच्या पालक मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे या बदलाची विशेष चर्चा आहे. दोन्ही नेत्यांकडून पुण्यात बैठका घेतल्या जायच्या. त्याची चर्चा व्हायची. आता अजित पवार पुण्याच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावती या दोन जिल्ह्यांच्या पालक मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये कोल्हापूरच्या पालक मंत्रीपदावरुन सुद्धा धुसफूस असल्याच स्पष्ट झालं आहे. हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालक मंत्री पदावर निवड होताच समर्जित घाडगे यांनी मुश्रीफ यांना थेट इशारा दिला आहे. “भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ याना पालकमंत्रीपद मिळाले हे त्यांनी विसरू नये. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल” असं समर्जित घाडगे म्हणाले. जिल्ह्याच्या राजकारणात समर्जित घाडगे हे हसन मुश्रीफ यांचे मोठे विरोधक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून समर्जित घाडगे यांनी आपली अस्वस्थतचा जाहीरपणे व्यक्त केली आहे.
‘जीत उतनी शानदार होगी’
“हसन मुश्रीफ ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील, त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहीन. हसन मुश्रीफ मुख्यमंत्री झाले, तरी मला फरक पडत नाही. पालकमंत्री तर सोडाच, त्यांच्याशी माझा संघर्ष कायम अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी” असं समर्जित घाडगे म्हणाले.