अहो पुण्यात ठिकंय, पण आता मुंबईपर्यंत बॅनरबाजी करताय का? निकालापूर्वीच आमदार झाल्याचे बोर्ड थेट हायवेवर झळकले

| Updated on: Mar 01, 2023 | 9:53 AM

कसबा पेठ मतदार संघातील बॅनरचे लोण आता थेट मुंबईच्या रस्त्यावर दिसू लागले आहे. निकालाच्या आधीच आमदार झाल्याचे फलक झळकू लागले आहे.

अहो पुण्यात ठिकंय, पण आता मुंबईपर्यंत बॅनरबाजी करताय का? निकालापूर्वीच आमदार झाल्याचे बोर्ड थेट हायवेवर झळकले
Image Credit source: Google
Follow us on

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, चिंचवड : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा ( Pune Election ) निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. पुण्यातील निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली असून सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांचा अतिउत्साह बघायला मिळत आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर ( Banner ) निकाला आधीच झळकले होते. त्यावरून गुन्हा दाखल झालेला असतांना चिंचवड मतदार संघासह मुंबई द्रुतगती मार्गावरही चिंचवड मधील उमेदवाराचे बॅनर झळकले आहे.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक झळकले आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरात देखील अशा आशयाचे बॅनर झळकले आहे. खरंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे.

काही तासांनी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नागरिकांनी कुणाला कौल दिला हे स्पष्ट होणार असले तरी दुसरीकडे निकालाच्या आधीच आमदार झाल्याचे बॅनर झळकू लागल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

निकाल घोषित होण्याला काही तास शिल्लक बाकी आहेत, त्याअगोदरच मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून फलक लावण्यात आलेत आहेत.

खरंतर पुण्यातील विजयाच्या आधीच आमदार झाल्याच्या आशयाच्या फलकाचे लोण आता द्रुतगती मार्गावर येऊन पोहचल आहे. कसबा मतदार संघात ही हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर या दोघा उमेदवारांचे फलक झळकले होते.

कसबा पेठ मतदार संघात निकालाच्या आधीच बॅनर झळकल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच चर्चा होऊ लागली आहे. याशिवाय कसबा आणि चिंचवडमध्ये झालेली निवडणूक पाहता अत्यंत चुरशीच्या या निवडणुका झाल्या आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात खरी लढत दिसून येणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत दिसणार आहे.

दोन्ही मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून गुरुवारी म्हणजेच उड्या मंतमोजणीला सुरुवात होणार असून जनतेने कुणाला कौल दिला आणि कुणाला नारळ दिला हे स्पष्ट होणार आहे.