पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान एका शिवनेरीच्या एका प्रवाशाला अन्नपदार्थातून बेशुद्ध करीत त्याला लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणतील आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणाचा धडा घेत जागे झालेल्या महामंडळाने आता ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यासाठी एक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत आता भाडेतत्वावरील शिवनेरीच्या ड्रायव्हर आणि चालकांना अधिक खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवनेरी एसटी सर्वात प्रतिष्ठीत सेवा आहे. या मुंबई ते पुणे शिवनेरीत असा धक्कादायक प्रकार घडल्याने एसटी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
एसटी महामंडळाचा प्रवास हा आतापर्यंत सुरक्षित प्रवास मानला जात होता. परंतू आता एसटी दादर ते पुण या शिवनेरी सारख्या प्रतिष्ठीत सेवेत हा प्रकार घडल्याने एसटी महामंडळाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मुंबई विभागात दिनांक १४ जून २०२४ रोजी शिवनेरी बस क्र.एम एच १२ व्ही एफ ६६९७ मधील प्रवासी शैलेंद्र साठे यांच्याबाबत घडलेल्या घटनेमुळे एसटी प्रतिमा डागाळली गेली आहे. एसटी महामंडळाबाबक प्रसिध्दीमाध्यमांवर प्रवाशी सुक्षिततेबाबत तीव्र प्रतिक्रीया आल्या आहेत. तसेच राज्य मानवी हक्क आयोगाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
कामगिरीवरील वाहकाने नियोजित फेरी संपल्यानंतर बसमधील सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरल्याची खात्री करावी, विविध मार्गावर एसटी महामंडळाने नेमुन दिलेल्या अधिकृत हॉटेल थांब्यावरच बस अल्पोपहारासाठी थांबवावी, एसटी बस अधिकृत हॉटेल थांब्यावर पार्किंग करतांना किंवा पार्किंगमधून मार्गस्थ करतांना वाहकांची मदत घ्यावी. विनावाहक बसबाबतीत चालकाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, बस सुरु करण्यापूर्वी बसमधील सर्व प्रवासी आल्याची खात्री करावी त्यानंतर बस सुरु करावी.
एसटी महामंडळाच्या भाडेतत्वावरील बस चालकांनी आता प्रवाशांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रवासा दरम्यान एखाद्या प्रवासी अस्वस्थ दिसल्यास बिघडल्याचे निदर्शनास आल्यास चालक आणि वाहकांनी त्वरीत या प्रवाशांसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे, याबाबत नजीकच्या आगारातील आगार व्यवस्थापक किंवा स्थानकप्रमुखांना तातडीने कळवावे. संबंधित प्रवाशाच्या नातेवाईकांना देखील कळवावे. प्रवासादरम्यान एखादी अनुचित घटना घडल्यास कामगिरीवरील चालक आणि वाहकांनी त्वरीत नजीकच्या पोलिस स्टेशनला आणि नजीकच्या एसटी आगारास तातडीने खबर द्यावी अशाही सूचना एसटी महामंडळाने जारी केल्या आहेत.
एका व्यापाऱ्याला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देत त्याचे संपूर्ण दागिने आणि पैसे घेऊन एका प्रवाशाने पलायन केल्याची घटना एसटीच्या प्रतिष्ठीत शिवनेरी बसमध्ये नुकतीच घडली आहे. कॉफी पिल्याने गुंगीत असणारा प्रवासी दादरला ‘शिवनेरी’ने बेशुद्धावस्थेत पोहोचला. शिवनेरी स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी या सुशिक्षित इसमाला नशेत असल्याचे समजून म्हणून रस्त्याच्याकडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ टाकून दिले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचा चेहरा ओळखून त्यांना रुग्णालयात दाखल केले. शैलेश साठे यांनी वाकड येथून शिवनेरी एसटी पकडली होती. ते दुबईतील मोठे व्यापारी असून पुण्यात स्थायिक झाले आहेत. ते 80 तासांनी रुग्णालयातील उपचारांनी कसेबसे शुद्धीवर आले त्यानंतर सूत्र हलली आणि आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक झाली.