गणेश सोळंकी, बुलढाणा | दि. 28 फेब्रुवारी 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय. निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. त्यामुळे शेड नेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झालेय. गारांचा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात होता की 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप शेत शिवारात कायम आहे. गारा अद्याप विरघळली नाहीय. गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची एकच गार तयार झालीय. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. दरम्यान आता पुन्हा विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भामधील चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट पुणे वेधशाळेने दिला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होणार आहे. या ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रचंड गारठा होता, तो आता कमी झाला असून किमान तापमान आता १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एकूण 823 गावातील 44 हजार 579 हेक्टरवर शेती पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात 21 हजार 768 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची नुकसानीची प्राथमिक आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली. यामुळे हातातोंडाशी आलेले हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, कापूस, भाजीपाला व संत्रा पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान विदर्भात झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले आहेत. आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची अपेक्षा आहे.