महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर आज उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेते हे एकाच पक्षाचे आहेत. पण छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भुजबळांवरच निशाणा साधला. विशेष म्हणजे नुकतंच भुजबळांचे येवल्यातील कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांनी काल माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांनी भुजबळांवर टीका केली होती. त्यानंतर आता खुद्द माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे छगन भुजबळ आता काय प्रत्युत्तर देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“भुजबळांसाठी स्वतः भुजबळ यांचा मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी आहेत. भुजबळांना अन्य ओबीसी दिसत नाहीत”, अशा शब्दांत राज्याचे नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “आमच्या पक्षाने भुजबळांवर कोणताही अन्याय केलेला नाही, त्यामुळे भुजबळांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही. जातीयवादाचा ढोंग मला अजिबात मान्य नाही”, अशी स्पष्ट भूमिका माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे.
“छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मनातलं शल्य बोलून दाखवलं असेल. मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल, तर मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे करतील. मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे ओबीसी तर 16 मंत्री मराठा समाजाचे आहेत. ओबीसींना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांचं स्वागत आहे. भुजबळांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचाय तो ते घेऊ शकतात”, असं मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
“भुजबळांना काय वाटतं त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल? त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असेल दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार?”, असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला. “चूक असेल तर समजूत काढणार ना, चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
“राज्यातील गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रितपणे राहतात काम करतात, एकमेकांवर त्यांचा विश्वास आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करणं हा विचारच मला पटत नाही. जातीयवादाचं ढोंग मला अजिबात मान्य नाही. भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी मध्यस्थी करणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका माणिकराव कोकाटे यांनी मांडली.