अहमदनगरः अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्याजागी झालेल्या पोटनिवडणुकीत आता भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी विजयी झाले आहेत. या विजयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या ठिकाणी परदेशी यांनी 517 मतांनी बाजी मारली आहे.
अशी झाली निवडणूक
अहमदनगर महानगरपालिका प्रभाग 9 क्रमांकाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे सुरेश तिवारी यांचा भाजपचे प्रदीप परदेशी यांनी 517 मतांनी पराभव केला. परदेशी यांना 3106 मते पडली. महाविकास आघाडीच्यावतीने उभे राहिलेले शिवसेनेचे सुरेश तिवारी यांना 2589 मते पडली, तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली. या प्रभागातील श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती.
शिवरायांबद्दल अपशब्द
अहमदनगरचा उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने महापालिका अधिकाऱ्याला फोनवरुन शिविगाळ केली होती. या दरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं. ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर श्रीपाद छिंदम हा फरार झाला. या काळात छिंदमच्या घरावर दगडफेकही झाली होती.
अन् निवडणूक लागली…
मात्र, एवढं होऊनही श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा मनपा निवडणुकीला उभा राहिला आणि एवढ्या वाईट पातळीचं कृत्य करुनही त्याचा त्या निवडणुकीत विजयही झाला. मनपा निवडणुकीतील विजयानंतर श्रीपाद छिंदमने पश्चाताप केल्याचं दाखवलं, छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेसमोर त्याने माफी मागितली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका देत नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात तो कोर्टात गेला. मात्र, तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती.
नागरिकांनी जागरूक होण्याची गरज
विशेष म्हणजे श्रीपाद छिंदमला विधानसभेच्या निवडणुकीत बसपाने तिकीट दिलं आणि त्याने दणदणीत प्रचारही केला. मात्र, मतदारांनी त्याला नाकारल्यानं त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर नगरसेवकपद रद्द झाल्याने आता त्याची राजकीय कारकीर्द तर संपल्यातच जमा आहे. मात्र, लोकांनी सुद्धा आता शहाणे होण्याची गरज आहे. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, हे वारंवार पडताळून पाहावे लागेल. नाही तर समाजाला जबर किंमत मोजावी लागेल.
इतर बातम्याः
मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल, पाटलांची टोलेबाजी, रश्मी ठाकरेंवर नेमकं काय म्हणाले?