राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे 31 बळी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; काँग्रेस नेत्याचा शाब्दिक हल्ला

| Updated on: Oct 03, 2023 | 4:06 PM

Vishwajeet Kadam on CM Eknath Shinde : 'या'संदर्भात शासनाने तातडीने समिती गठीत करून योग्य निर्णय घ्यावा; काँग्रेस नेत्याने शिंदे सरकारला आवाहन केलं आहे. तसंच नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील 31 रूग्णांचा मृत्यूवरही त्यांनी भाष्य केलंय. ते शिर्डीत बोलत होते. वाचा सविस्तर...

राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे 31 बळी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; काँग्रेस नेत्याचा शाब्दिक हल्ला
Follow us on

शिर्डी, अहमदनगर | 03 ऑक्टोबर 2023 : नांदेडच्या शासकीय रूग्णालयात पहिल्या दिवशी 24 तर काल 7 अशा ऐकून 31 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. नांदेडमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे 31 निष्पाप लोकांचे अन् बालकांचे बळी गेले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्यसरकारचं दुर्लक्ष आहे. समर्थन देणाऱ्या आमदारांची खातीरदारी करण्यात सरकार व्यस्त आहे. ठाण्यानंतर नांदेडमध्ये अशी घटना घडणं म्हणजे सरकार लोकांच्या प्रश्नांसंदर्भात आणि आरोग्यासंदर्भात गंभीर नाही. बालकांच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:ख आम्ही सहभागी आहोत. ट्रिपल इंजिन सरकारकडून फक्त घोषणा केल्या जातात. त्यांनी अंमलबजावणी मात्र होत नाही, असं म्हणत माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

विश्वजित कदम हे आज शिर्डीत होते. त्यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. काँग्रेस अनुसूचित विभागाच्या शिर्डीतील प्रशिक्षण शिबिरालाही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे. जातीनिहाय जनगणनेवर विश्वजित कदम यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करायलाच पाहिजे.मात्र राष्ट्रीय स्तरावर देखील जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे. काही पक्ष वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करून आरक्षणाच्या मुद्याला राजकीय वळण देत आहेत. प्रत्येक जाती धर्मातील गरिबांना न्याय देण्यासाठी जनगणना होणं गरजेचं आहे, असं विश्वजित कदम यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील हे सध्या उपोषण करत आहेत. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील 17 गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. टेंभू योजनेत या गावांना समाविष्ट केलं पाहिजे, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. यावरही विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली. सुमनवहिनी आणि रोहित पाटलांशी फोनवर चर्चा झाली आहे. या प्रश्नासाठी स्वर्गीय पतंगराव कदम आणि आर. आर. आबांनी मोठा संघर्ष केला आहे. पंचवीस तीस वर्षात टेम्भूचे पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळालं. मात्र काही भाग अजूनही वंचित आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने समिती गठीत करून योग्य निर्णय घ्यावा. सरकारने दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा, असं विश्वजित कदम म्हणालेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे सगळे मविआचे घटक आहेत. मविआ म्हणून राज्यात एकत्र राहण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. शरद पवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कसलीही चिंता नाही. अजित पवार महायुतीसोबत गेल्याने मविआवर कोणताही परिणाम झाला नाही, असंही ते म्हणाले.