मागच्यावर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला. धर्मांतरानंतर जमीर शेख यांचं नाव बदलून शिवराम आर्य झालं. पत्नी अंजुम शेखने सीता आर्य हे नाव धारण केलं. दोन मुलांना बलराम आणि कृष्णा अशी नावे देण्यात आली. आता शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी जमीर शेख यांनी कुटूंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अहमदनगरच हे मुस्लिम कुटुंब हिंदू बनलं होतं.
हिंदू धर्मात प्रवेश का केला? असा प्रश्न शिवराम आर्य यांना त्यावेळी विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाची हिंदू धर्मावर श्रद्धा असल्याच सांगितलं होतं. “आम्ही हिंदू धर्माला मानतो. आजी-आजोबा, आई-वडिलांनी सनातनी असल्याचं मला शिकवलं. हिंदू पद्धतीने पूजा पाठ देवाची पूजा अर्चा करायचो म्हणून धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला” असं जमीर शेख त्यावेळी म्हणाले होते. लोकांना नाव पुकारताना रामाच स्मरण व्हाव यासाठी शिवराम नाव धारण केल्याच त्यांनी सांगितलं होतं.
पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश का करायचा आहे?
शिवराम आर्य आता पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करतायत त्यामागे आर्थिक कारण आहेत. शिवराम यांची आठ वर्षाची मुलगी अश्विनी हिची मेंदूची शस्त्रक्रिया करायची आहे. पण शस्त्रक्रियेसाठी हिंदू धर्मातील लोकांकडून मदत न मिळाल्याने पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे. शिवराम आर्यची मुलगी अश्विनी शिवराम आर्य हिच्या मेंदूत गाठ आहे. या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. शिवराम आर्य यांच्याकडे काही कागदपत्र हिंदू नावाप्रमाणे तर काही कागदपत्र मुस्लिम नावाप्रमाणे आहेत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही.