BIG BREAKING | काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

| Updated on: Jan 03, 2024 | 12:10 AM

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला राहाता तालुक्यातील लोणी गावात झाला. या हल्ल्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे गंभीर जखमी झाले आहेत.

BIG BREAKING | काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
Follow us on

मनोज गाडेकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 2 जानेवारी 2024 : काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला राहाता तालुक्यातील लोणी गावात झाला. या हल्ल्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौगुले यांच्यावरील हल्ल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चौगुले आणि आरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आश्वी येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाहून परतत असताना दोघांवर लोणी गावात हल्ला झाला.

या हल्ल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे यांनी जखमी झालेले सचिन चौगुले आणि सुरेश आरणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. काँग्रेस कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झालीय. “आजची घटना दहशतवादी, विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न. शिर्डी मतदारसंघातील जनता सहन करणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे कठोर कारवाई करावी. दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा तीव्र आंदोलन करु”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

सचिन चौगुले हे नेहमी आपल्या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधत असतात. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सचिन चौगुले हे बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिर्डी मतदारसंघात ते महत्त्वाचा राजकीय चेहरा आहेत. त्यामुळे ते आजच्या शरद पवारांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला हजर होते. पण कार्यक्रम आटोपून परतत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चार ते पाच दुचाकी त्यांचा पाठलाग करुन आल्या होत्या. तर एक चारचाकी गाडी पुढच्या बाजूने आडवी आली. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला सुरु झाला. या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसकडून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय.