अहमदनगर | 19 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा भरोसा नाही. कारण विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीपासून महाराष्ट्रात अनपेक्षित अशा राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या त्याबाबत कधीच कुणी कल्पना केली नसेल. या घटना सातत्याने सुरुच आहेत. त्यानंतर आगामी काळातही सुरुच राहतील की काय? असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे वेगवेगळे दावे केले जात आहेत. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील बडा नेता भाजपात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीदेखील मिळाली आहे. या पक्षप्रवेशाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात”, असं म्हणत विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला. विखे पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपात प्रवेश केला होता. आधी खासदार सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात एकाच पक्षात असताना दोघांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याची अशी चर्चा नेहमी त्यावेळी होत असे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल विखे पाटलांनी मोठं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाळासाहेब थोरात हे सुद्धा भाजपच्या वाटेला आहेत का? किंवा त्यांचे भाजप नेत्यांसोबत खरंच जिव्हाळ्याचे संबंध आहेत का? असेल तर या संबंधातून आगामी काळात काही राजकीय कनेक्शन निर्माण होऊ शकतं का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केलीय. आमची सर्वांची तीच भूमिका आहे. मात्र अन्य समाजात आरक्षण देणे शक्य नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा समाज मागासलेला असल्याचे सँपल सर्वेत सिद्ध होतंय. उद्याच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय. सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमताने मंजूर होईल अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी विशेष अधिवेशनावर दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या निर्यातीशुल्काच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. याबाबत विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. “सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते. शेती मालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावे. सूचना करणे सोपे आहे. मात्र जेव्हा सत्तेत असताना संधी होती त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
“आता भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.