मनोज गाडेकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 13 नोव्हेंबर 2023 : राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या गुहा गावात मोठा तणाव बघायला मिळाला आहे. गुहा गावात पुजेवरुन दोन गटात राडा झालाय. मारहाणीनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस दाखल झाले आहेत. या गावात वास्तू मंदिर आहे की मशीद? असा वाद कोर्टात प्रलंबित आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर गावात मोठा तणाव निर्माण झालाय. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. संबंधित घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे.
या घटनेवर एका गावकऱ्याने प्रतिक्रिया दिली. “नेहमीप्रमाणे आज पुजारी मंदिरात पुजेसाठी आले असता त्यांना काही समाजकंटकांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना काही गोष्टी विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांनी पुजाऱ्यांना अक्षरश: दमबाजी करुन मारहाण केली. त्यातून वाद वाढला”, अशी प्रतिक्रिया गावातील एका नागरिकाने दिली.
हा वाद दर्गा आणि मंदिराचा आहे. संबंधित ठिकाणी दर्गा आहे, असा एका समाजाचा दावा आहे. तर दुसऱ्या समाजाकडून तिथे मंदिर आहे, असा दावा केला जातो. हा तीन वर्षांपासूनचा वाद आहे. तिथे दोन्ही समाजाच्या पुजाऱ्यांकडून पूजा केली जाते. प्रशासनाने अमस्येच्या दिवशी पूजा करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार अमावस्येच्या निमित्ताने पूजा झाल्यानंतर तिथे कीर्तन पार पडत होतं.
कीर्तनच्या आवाजावरुन सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचं परिवर्तन दोन गटात मारहाणीत झालं. गेल्या तीन वर्षांपासून हा वाद आहे. वक्फ बोर्ड आणि न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. पण तरीही दोन्ही समाज सातत्याने आक्रमक होताना दिसतात. या मुद्द्यावरुन अनेक मोर्चेही निघाले आहेत. तसेच अनेकदा हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत. आतादेखील तशीच घटना समोर आलीय.
दरम्यान, आजच्या घडनेनंतर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. दर्गा आणि मंदिराचा वाद सातत्याने समोर येत आहे. दोन्ही समाजाचे नागरीक आक्रमक होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालय आणि प्रशासन कधी मार्ग काढेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.