‘…तर माझा कार्यक्रम झाला असता’, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मिश्किल वक्तव्य

| Updated on: Sep 10, 2024 | 8:19 PM

"साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला. दोन दिवस मी चिंतेत होतो. आज हा कार्यक्रम झाला नसता तर माझा कार्यक्रम झाला असता", असं मिश्किल वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

...तर माझा कार्यक्रम झाला असता, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मिश्किल वक्तव्य
राधाकृष्ण विखे पाटील
Follow us on

साईबाबा संस्थानच्या 598 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याचा निर्णय झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अभिनंदन करताना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची देखील आठवण झाली. “साईसंस्थान कर्मचाऱ्यांना संबोधित करताना विखे पाटील म्हणाले की, मला तो दिवस आठवतो ज्यावेळी आपण एक हजार लोकांना कायम केलं होतं. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनीही या बाबतीतला ऐतिहासिक निर्णय घेतला. तेव्हाही कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे भाग्य मला लाभले. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. आज पुन्हा साईबाबांच्या आशीर्वादाने यश मिळाले आहे. 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मी साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. साई संस्थानच्या प्रशासकीय समितीने प्रस्तावाला तातडीने मान्यता दिली. त्यामुळे आपण आजचा हा कार्यक्रम करू शकलो. नाहीतर मी दोन दिवस चिंतेत होतो की, एकतर कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होईल, नाहीतर माझा कार्यक्रम होईल”, असं विखे पाटलांनी मिश्किल वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 2000 सालापर्यंतचे 1052 कर्मचारी 2004 साली कायम झाले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर 598 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 598 कर्मचाऱ्यांसोबत 2023 पर्यंत सेवेत 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत घेतले जाणार आहे. रिक्त जागा तसेच पदोन्नतीची प्रकीया देखील पूर्ण करण्यात येणार असल्याने गणेश उत्सवातच कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होत आहे.