“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षात खूप मोठी कामं झाली. मात्र आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणालाही मुख्यमंत्री केले तरी आमचा पाठिंबा राहील”, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे. यासह “मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास नेवासा मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्यात चांगली कामे करून मंत्रिपदाला न्याय देईन”, असे देखील लंघे म्हणाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे विठ्ठलराव लंघे यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव करत लंघे यांनी विजयी गुलाल उधळला. मुंबई येथे एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यावर शिंदे यांनी लंघे यांचे कौतुक करत अभिनंदन केले होते. मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार आपापल्या मतदारसंघात परतले असून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. या दरम्यान विठ्ठलराव लंघे यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली.
मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वस्वी अधिकार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असून जो मुख्यमंत्री होईल आम्ही सर्व एकदिलाने त्याच्यासोबत राहणार आहोत. मला मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना असून तशी संधी मिळाल्यास मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू. मिळालेल्या संधीचे सोने करून मंत्रिपदाला नक्कीच न्याय देऊ, असा विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केलाय.
मुंबईत घडामोडी सुरू आहेत. विविध विषयांवर पक्षश्रेष्ठी चर्चा करत आहेत. जो निर्णय होईल तो आम्ही सर्व विजयी आमदार स्वीकारणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निश्चितच चांगलं काम केलं आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. लाडकी बहीण योजनेचा परिणाम महायुतीच्या विजयात दिसून आलाय. विकासाचं व्हिजन घेऊन मुख्यमंत्र्यांनी काम केलंय. मात्र सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा प्रश्न हा आमचा नाही. वरच्या पातळीवर जो निर्णय होईल त्यासोबत आम्ही राहू, असंदेखील लंघे यावेळी म्हणाले.
मंत्रीपदाचा निर्णय देखील वरिष्ठांचा, तो आम्ही स्वीकारणार. मात्र नेवासा विधानसभा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉक भरून निघावा ही जनतेची इच्छा आहे. संधी मिळाली तर माझ्या अनुभवाचा फायदा तालुक्यालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला होईल. पण आमची तशी मागणी नाही. संधी मिळाली तर न्याय देण्याचं काम करू, असं विठ्ठलराव लंघे यांनी स्पष्ट केलं.
नेवासा येथे संत ज्ञानेश्वर यांची कर्मभूमी असल्याने 850 कोटींचा विकास आरखडा मंजूर झालाय. त्यासाठी निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न राहील. निवडणूक प्रचारा दरम्यान मॅनेज होणारा उमेदवार असा आरोप विरोधकांनी केला. मात्र त्याचं उत्तर जनतेनं दिलंय. माजी मंत्री विद्यमान आमदार, माजी आमदार यांना पराभूत करून जनतेने मला विजयापर्यंत नेलं. त्यामुळे पाठिमागे न बघता जनतेची सेवा करण्याला आणि विकसाला आमच प्राधान्य आहे. जनेतेने त्यांना जागा दाखवली आहे, असं म्हणत नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्यावर निशाणा साधला