मुंबई : अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप नसून आमच्यासाठी दुखवटा आहे. आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचे नाही, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहणार आहे. हा लढा हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आझाद मैदानात सध्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक आगारातील कर्मचारी आझाद मैदानात आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे.
अजय गुजर कोण? माहीत नाही
अजय गुजर कोण? आम्हाला माहीत नाही आणि गुणरत्न सदावर्तेंना आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आमच्या मागण्या मान्य करून घेण्याचा अजय गुजर यांना कुणी अधिकार दिला? असा सवालही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. पुण्यातूनही एसटी कर्मचाऱ्यांनी आम्ही कुठल्याही संघटनेचे सभासद नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
अजय गुजर यांनी सेटिंग केली?
अजय गुजर यांना सरकारकडून काहीतरी मिळाले असेल, म्हणून त्यांना संप मागे घेत असल्याची घोषणा केली असा आरोपही काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. अजय गुजर कोणत्या अमिषाला बळी पडले? असा सवाल आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर संपकऱ्यांना कोणतरी भडकवत आहे, उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया अजय गुजर यांनी दिली आहे. तर उद्यापर्यंत एसटी कर्मचारी कामावर हजर होतील, असेही ते म्हणाले आहेत. तर सदावर्ते एक वकील आहेत त्यांनी त्यांचे काम करावे, आम्हाला असचे काम करू द्या, असे गुजर म्हणाले आहेत. मात्र जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर कामावर जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.