राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबतदेखील बैठक पार पडली आहे. भुजबळ यांच्याकडून मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. असं असताना आता अजित पवार यांचं छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या कार्यक्रमात याबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांचं नाव घेणं टाळलं आहे. पण त्यांचा रोख हा छगन भुजबळ यांच्याच दिशेला होता. “नवीन लोकांना संधी दिली तर काही लोकांनी रोष व्यक्त केला”, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यावर छगन भुजबळ यांनीदेखील प्रतिक्रिया “राज्यात आपली जास्त गरज आहे, असं आधी सांगितलं. मग आता गरज कमी झाली आहे का?”, असा सवाल भुजबळांनी केला आहे. “लोकसभेत पाठवणार होते, तिथेही थांबवलं, मग तरुणपणाची व्याख्या काय?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
“मंत्रिमंडळात ज्यावेळेस आपण नावं दिली तेव्हा काही मान्यवरांना थांबायला सांगितलं. त्यावर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविकपणे कधी काही नवी लोकांनादेखील संधी द्यावी लागते. कधी काही जुन्यांना इथे संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल याबद्दल आपण विचार केला, ज्यांना योग्य पद्धतीचा मान-सन्मान दिला गेला पाहिजे. तो देण्यासाठी अजित पवार कुठेच तसूभरही कमी पडणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“तरुणपणाची व्याख्या ठरवायला पाहिजे ना? किती वर्ष तरुण म्हणायचं? 67-68 वर्ष तरुण म्हणायचं? अगोदर लोकसभेत पाठवत होते. तेव्हा माझी तयारी झाली तेव्हा तिथे मला थांबवलं. दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या. मी म्हटलं मला जाऊद्या आता. मी इथे 40 वर्षे काम केलं. तेव्हा ते म्हणाले, तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे. मग आता ताबोडतोब गरज कमी झाली? मला लढायला सांगायलाच नको होतं”, अशी खंतल छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.