सर्वात मोठी बातमी! महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून अजित पवार आऊट?

| Updated on: Nov 08, 2024 | 6:49 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

सर्वात मोठी बातमी! महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून अजित पवार आऊट?
अजित पवार
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट झाल्याचं बघायला मिळत आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत नरमाईचे संकेत देण्यात आले आहेत. दोन पावलं पुढे-मागे घ्यावे लागतात. कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कॉम्प्रोमाइज करणारी व्यक्तीच पुढे यशस्वी होते, असं अजित पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा राजकारणात सिनियर आहोत. पण आपल्याला अद्यापही मुख्यमंत्री होता आलेलं नाही, अशी खंत त्यांनी जाहीर कार्यक्रमात याआधी व्यक्त केली आहे. तसेच 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या आघाडीत जास्त जागा जिंकून आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, असंदेखील म्हणत अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्यावर आपल्याला मुख्यमंत्री होऊ न दिल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला होता. पण आता अजित पवार मुख्यमंत्रीपदाबाबत बॅकफूटवर आलेले बघायला मिळत आहेत.

“अजित पवारांना चांगलं माहिती आहे की, 145 चा आकडा जोपर्यंत आपण गाठू शकत नाही तोपर्यंत ते पद आपल्याला मिळू शकत नाही. अलिकडे मीडियाचे कॅमेरे प्रत्येक गोष्ट टिपत असतात. त्यामुळे कार्यकर्ते बॅनरवर उत्साहाच्या भरात भावी मुख्यमंत्री म्हणून माझं नाव लिहितात. पण तसं होऊ शकतं का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही लिहिलेलं असतं. त्यामुळे मला ते उचित वाटलं नव्हतं म्हणून मी कार्यकर्त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्रीपदावर हात ठेवला होता”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“मला मान्य आहे, मी आधी 90 जागांबाबत बोललो. पण आता निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आम्ही युती केलेली आहे. युतीमध्ये आमचं पहिलं टार्गेट हे 175 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून आणायच्या. मग आम्ही एकत्र बसू आणि त्यातून नेत्याची निवड करु”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना दोन पावलं पुढे-मागे करावेच लागतात. कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढे यशस्वी होतो. त्यामुळे आता तो मुद्दा आमच्या दृष्टीने गौण आहे. महायुतीच्या सर्वाधिक जागा जनतेतून निवडून याव्यात हाच आमचा सर्वांचा अजेंडा आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.