मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सव्वा कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे पोहोचले आहेत. पण या योजनेचा फायदा घेऊन एका दाम्पत्याकडून तब्बल 26 अर्ज भरण्यात आले. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून जेलमध्ये चक्की पिसायला लावणार, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहिणी योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत. यामधे खेड तालुक्यात १ लाख ३ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. एका महिलेला एका योजनेचाच लाभ घेता येणार आहे. एका नवरा बायकोने २६ नावे दाखविली. आम्हाला बांबू लावायचे काम करत आहेत. आमची द्यायची दानत आहे. तुम्ही लाभ घ्या. पण ऐपत असताना असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवत चक्की पिसिंग करायला लावणार”, असा इशारा अजित पवारांनी दिला. ते खेडमध्ये कार्यक्रमात बोलत होते.
“मी एखाद्या कार्यक्रमासाठी गेलो तर निस्ती फित कपायाची म्हणून जात नाही तर ते काम कसं होतय त्याची माहिती घेतो. आज दिवसभर केलेली उद्घाटने ही चांगली झाली आहेत. आरोग्य केंद्राचे काम उत्कृष्ट झालंय. त्यामुळे लोकांची येण्याची संख्या वाढली. पूर्वी लोक येत नव्हती हे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या सत्तेचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो हे आम्ही शिकलोय. आम्ही कामे करतोय. मात्र मागण्या संपत नाहीत. कमी पैशात कामे मार्गी लागू शकतात. मी केव्हाही कणात्याही जाती धर्मावर अन्याय केला नाही. मी सगळ्या घटकांचा विचार केला. कोणत्या एका जातीपातीचा विचार केव्हाही केला नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“काम करायचे म्हणजे वरवर कोणीही काम करतं. मात्र कामामध्ये फरक आहे. खेडच्या आरोग्य केंद्राचे काम बॉस कंपनीने CRS फंडातून केलं. अशी उत्कृष्ट कामे आपल्याकडे का होत नाही? याची विचारणा मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यांना आम्ही पैसे देतो. मग कामे का होत नाही? आज दिलीप मोहिते पाटील माझ्याबरोबर आहेत. आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे काम करतोय. तीन वर्षांमध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या कार्यसम्राट आमदारांनी साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. आजपर्यंत जेवढे आमदार झालेले असतील त्यांची कारकीर्द काढा आणि दिलीप मोहिते यांची पाच वर्षाची कारकीर्द काढा”, असं अजित पवार म्हणाले.
“आमच्यामध्ये अजूनही काहीतरी करण्याची धमक आहे. आम्ही दिलीप मोहिते पाटील यांना आमदार केलं. मात्र त्यांना तुम्ही मंत्री पद दिलं नाही अशी खंत तुमची आहे. खेडची जागा जर आपल्याला आली तर दिलीप मोहिते यांची उमेदवारी फिक्स. हे महायुतीचे सरकार आहे. घटकपक्षाला विश्वासात घेवून काम करायचे आहे. जागा वाटणीला आली तर हे समजून घ्या दिलीप मोहिते हे उमेदवार असतील. मात्र जागा आली तर चांगल्या मताने निवडून द्या”, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं.