अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार, महायुतीत नाराजी नाट्य, पडद्यामागे काय घडलं?

| Updated on: Jul 24, 2024 | 5:51 PM

महायुतीमधील घडामोडींची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीवाटपावरुन मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याचवरुन महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार, महायुतीत नाराजी नाट्य, पडद्यामागे काय घडलं?
महायुती
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीच्या तीनही घटकपक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं बघायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीला तीन महिने बाकी असताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सुरु असलेल्या या घडामोडी महायुती सरकारसाठी घातक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महायुतीत नेमकं नाराजी नाट्य काय आहे? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच काल बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या नेत्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या परवानगीनेच सर्व खात्यांना निधी दिला जातोय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी देण्यावरुनच वादाची ठिणगी पडली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं?

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री वीजयकुमार गावित या मंत्र्यांनी अजित पवारांकडे अधिकच्या निधीची मागणी केली होती. पण अजित पवारांनी अधिकचा निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ बैठकीतलं वातावरण तापलेलं होतं. कारण अजित पवार आणि या तीनही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

अजित पवार म्हणाले, 7 महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे 1 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी निधी देण्यास नकार दिल्याने तीनही मंत्री नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराज मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबतची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. या बैठकीनंतर महायुतीत आणखी हायव्होल्टेज घडामोडी घडल्या आहेत.

अजित पवार अमित शाह यांच्या भेटीला

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर अजित पवार हे काल रात्री थेट दिल्लीला गेले. अजित पवार यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. दुसरीकडे या बैठकीत कदाचित मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या नाराजी नाट्याबद्दलची चर्चा झाल्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या भेटीला

विशेष म्हणजे यानंतरही घडामोडी थांबल्या नाहीत. अजित पवार दिल्लीतून जावून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुनही तीनही पक्षांत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला अजित पवार जबाबदार असल्याचं चित्र काही जणांकडून निर्माण केलं जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची शक्यता आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस महायुती एकसंघ राहण्यासाठी परिस्थिती कशी हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.