राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर ढगात शिरले. कुठेही जमीन दिसत नव्हती, तो किस्सा अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितला. अन् सभागृहात खसखस पिकली. देवेंद्र फडणवीस खळखळून हसले.
अजित पवार यांनी सांगितले की, मुंबईवरुन गडचिरोलीत मी आणि देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने निघालो होतो. नागपूरपर्यंत सर्व काही ठीक होते. पण नंतर हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरले. कुठे जमीन दिसत नव्हती. झाडे दिसत नव्हती. माझ्या पोटात गोळा आला. आषाढी एकादशी होती. त्यामुळे पांडुरंगा, पांडुरंगा असे नाव घेत होतो. पण देवेंद्र फडणवीस शांत होते. ते म्हणाले, काळजी करु नका…काहीच होणार नाही. माझे सात अपघात झाले आहेत. मात्र माझ्या नखालाही धक्का लागला नाही. तुम्हालाही काहीच होणार नाही. यावर सभेच चांगलीच खसखस पिकली.
१७ जुले रोजी सकाळी साडेअकरा वाजता दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर होते. अहेरी तालुक्यात वडलापेठ येथील दहा हजार कोटींच्या सुरजागड इस्पात कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला. खराब वातावरणामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमास येतील का नाही? अशी शंका वाटत होती, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी सकाळी घडलेली घटना सांगितली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर ऐकून मी त्रस्त झालो. त्यांना मी म्हटले, माझ्या पोटात गोळा आला आहे अन् तुमचे काहीतरी भलतेच पुराण सुरु आहे. मी मात्र आषाढी एकादशीने पांडुरंग.. पांडुरंग.. पांडुरंग… जप करत हा प्रवास केला. मी घाबरलेलो होतो अन् हे महाराज (देवेंद्र फडणवीस) मला उपदेश करत होते. काही काळजी करू नका, असे म्हणत होते. या ठिकाणी पोहचेपर्यंत मी शांत बसलो होतो.