वेशांतराच्या आरोपावरुन अजितदादांचा सुप्रिया ताईंना थेट इशारा

| Updated on: Aug 02, 2024 | 8:54 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेशांतर करुन दिल्लीला जात असल्याचा दावा विरोधकांना सुरु केला आहे. या दाव्यानंतर आज अजित पवार यांनी त्यावर उत्तर दिले. ते म्हणाले की, मी लपून छपून राजकारण करत नाही. या दाव्यावर त्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना इशारा दिला आहे.

वेशांतराच्या आरोपावरुन अजितदादांचा सुप्रिया ताईंना थेट इशारा
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेशांतर करुन दिल्लीला गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर आता अजित पवारांनीच उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आपण वेशांतर करुन दिल्लीला गेल्याचा बातम्या साफ खोट्या आहेत. यावरुन त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना थेट राजकीय संन्यासाचा इशारा दिला आहे. वेशांतर करुन दिल्ली गेल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, नाहीतर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा असं थेट आव्हान अजित पवारांनी विरोधकांना दिलं आहे. भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार वेशांतर करुन दिल्लीला जात होते, अशी बातमी अजित पवारांसोबतच्या औपचारिक गप्पांमधून आली होती. ते वृत्त अजित पवारांनी फेटाळलं आहे.

मात्र या औपचारिक गप्पांना अप्रत्यक्ष दुजोरा खुद्द अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनीच दिला होता. ज्यादिवशी अजित पवारांच्या वेशांतराचं वृत्त प्रसिद्ध झालं., त्याच दिवशी हा प्रश्न सुनिल तटकरेंना विचारण्यात आला. त्यावर तटकरेंनी उत्तर दिलं होतं की, तूर्तास त्या वृत्तानुसार अजित पवार चार्टर प्लेनऐवजी सामान्य विमानानं दिल्लीत जायचे. प्रवासावेळी वेशांतर आणि नावात बदलही केलेला असायचा. मध्यरात्री दिल्लीला पोहोचून पहाट उजाडण्याआधी महाराष्ट्रात परतायचे. अशा गोष्टी समोर आल्या होत्या.

त्यावर विरोधकांनी नाव बदलून विमान प्रवासामुळे सुरक्षेवर प्रश्न उभे केले होते. त्याच मुद्दयांवर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.

अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी लपून छपून राजकारण करत नाही. पण बातम्या पेरुन आमची बदनामी केली जातेय. फेक नॅरेटीव्ह तयार केलं जातंय. चांगल्या योजना येत असल्याने विरोधक हादरलेत. त्यामुळे ते असे उद्योग करत असल्याचं अजित पवारांनी म्हटले आहे. मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे खोटे आहे. मला जायचे तर मी उघडपणे जाईल. मला घाबरण्याची गरज नाही.

संजय राऊत यांच्यावर हल्ला

राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढलीये. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो अशी टीका अजितदादांनी राऊतांवर केली आहे. समाजातील सर्व लोकं मला ओळखतात. त्यामुळे असं होणे अशक्य आहे. याला कुठलाही पुरावा नाही. असं ही त्यांनी म्हटलंय.