मुंबई : आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये ॲक्टिव्ह मोडवर असणारे अजित पवार (Ajit Pawar) आता विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यानंतर आक्रमक मोड वरती आले आहेत. अजित पवार यांचा दौऱ्याचा सपाट हा पूर्वीसारखाच सुरू आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या सकाळी सात वाजताच्या होणाऱ्या बैठका चर्चेत होत्या. तर आता विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न (Cm Eknath Shinde) अजित पवार हे बाहेरून करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार (Heavy Rain) पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं आहे. त्यावरून आता अजित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अधीच सरकारकडे ठेवली आहे. तसेच तातडीने अधिवेशन घ्या यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे दिसून आले. त्यानंतर अजित पवार हे आता पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर ते निघत आहेत, तिथून येते सरकार वरती टीकेचे बाण सोडताना दिसून येतील.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात असून आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 110 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन त्वरीत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.
नुकसानीमुळे जे शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. त्यांना सरकारने तात्काळ मदत करावी अशी, मागणी अजित पवार यांनी सरकारपुढे ठेवली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून ही अजित पवार सरकारवर सडकून टीका करताना दिसून आले. तर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर आता मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरत आहात? असा थेट सवाल अजित पवार यांनी आधीच शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.